3/10/25

महाकुंभ दर्शन


मला प्रयागराज ला पोचल्यावर हुश्श झाला. इतकी धावपळ आणि धाकधूक पोचायला कि तिथे पोचल्यावर आता गंगा दर्शन होणार आणि स्नान होणार याची खात्री झाली. प्रयागराज जरी पोचलो तरी अजून घाटापासून ८-१० किमी दूर होतो. आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि दुचाकी टॅक्सी करून घाटावर पोचलो. घाटावर पोचल्यावर सगळ्यात पहिले मला काही जाणवले असेल तर सगळ्या समारंभाची आणि समारंभाच्या सोयीची भव्यता आणि शिस्त. आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी गर्दी आधीच्या तुलनेत बरीच कमी होती. पण दूर-दूर पर्यंत तंबु पसरले होते, मोठे तात्पुरते रस्ते, इलेक्ट्रिक ऑटो आणि पुन्हा मोट्ठी मोकळी जागा आणि मग त्या पुढे गंगेचे पात्र. एका टप्प्यात डोळ्यात काहीच भरत नव्हते आणि ठरत नव्हते. जिथे एक मुख्य रस्ता होता, तिथं पर्यंत गंगेचे पाणी पावसाळ्यात येत. म्हणजे, महाकुंभाची संपूर्ण सोय, असंख्य तंबू, वाहतुकीचे मार्ग, अगणित लोक, हा सगळं पसारा गंगेने आपल्या पात्रातच सामावलेला होता. स्नान नाहीं झाला तरी गंगेने श्रद्धाळूंना आधीच पावन करण्याची काळजी घेतलेली आहे!

आम्ही दुचाकीने महाकुंभाच्या परिसरात पोचलो. किनाऱ्याची रेती विलक्षण मऊ होती. दुपारची तापली होती म्हणून नाहीं तर रेतीत झोपायला मजा आली असती. रेतीतच स्टीलच्या मोठ्या मोठ्या पाट्या टाकून तात्पुरते रस्ते बनवले होते. त्यावर चालायालाही सोय होती आणि तसेच इलेक्ट्रिक ऑटो पण मिळत. किनार्यावर अनेक घाट होते, आणि वेगवेगळ्या घाटापर्यंत पोचायला  इलेक्ट्रिक ऑटोने जाणे सोयीचे होते. आम्ही अश्याच ऑटोत बसून संगम घाटावर गेलो. आम्ही ज्या बाजूने संगमाच्या दिशेने प्रवेश केला होता,  त्याबाजूने यमुना येते, आणि मध्ये एक रेतीचे छोटे बेट आहे आणि त्या पलीकडून गंगा येते. आणि मधून गुप्त अवस्थेत सरस्वती येते. संगम घाटावर नदीचा प्रवाह फार वेगाने होता. झर-झर पाणी वाहात होते. पलीकडचे गंगेचे पण पाणी असेच वेगाने येतांना दिसत होते. घाटावर छान पायऱ्या बांधलेल्या होत्या आणि सगळी कडे अविरत स्वच्छता केली जात होती. पायऱ्या संपल्यावर पाण्यातील एक मोठा परिसर मोठं-मोठ्या प्लॅस्टीकच्या पिंपांना दोरखंडांनी बांधून वेढलेला होता, जनतेसाठी संगम घाटावर स्नान करायला. सहाजिकच त्रिवेणी संगमावर सगळ्यात अधिक गर्दी होती. तिथून काहीच अंतरावर वी-आय-पी लोकांचा पास असलेल्यांसाठी होड्यांची व्यवस्था होती. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य जनतेसाठी होड्यांसाठी अजून एक वेगळा धक्का बांधलेला होता. 

मी संगम घाटावरच पाण्यात आत गेलो. पाणी गुढग्याएवढेच होते. लोक जागोजागी पूजा करीत होते. आणि नारळ पाण्यात टाकीत होते. इतक्या गर्दीत, कोलाहालात, लोक इतके मग्न होऊन प्रार्थना, पूजा-अर्चा करीत होते कि मी त्या लोकांना बघण्यातच गुंतलो. किती श्रद्धा आणि केवढा भक्ती-भाव! देवावर श्रद्धा, पुनर्जन्मावर विश्वास आणि पाप-पुण्याच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्तीसाठी केवढी तळमळ. खूपदा आपण बुद्धिजीवी उगाच प्रश्नांच्या जाळ्यात फसतो आणि स्वतःला फसवितो. हुशार होण्याच्या भानगडीत भाबडेपणा हरवून बसतो. भाबडेपणाला अंधश्रद्धा समजून बसतो. या दोन्हीत बरेच अंतर आहे. कुंभमेळा असो कि आपली विठ्ठलाची वारी असो, तेथे जाण्याचे आमंत्रण कोणाला नसते, तेथे येण्यासाठी कोणालाही आवाहन केल्या जात नाहीं, जाण्याचा जोरा कोणावर नाहीं किंव्हा गेलो नाहीं तर मोक्ष मिळणारच नाहीं असेही नाहीं. पण तरी शेकडो-हजारो वर्षे लोक संख्येने प्रयागराज ला पोचतात. विठ्ठलाच्या वारीला जातात. आपला हिंदू धर्म एक नाहीं असे म्हणणाऱ्यांनी या कुंभला भेट द्यायला हवी होती. त्या जागेची ऊर्जाच वेगळी होती. सगळं परिसर जणू तेजपुंज झाला होता. म्हणूनच अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी कोटी आलेत. सगळं देश या समारंभाचे आकर्षणाने मोहून गेला. 

संगम घाटावर गर्दी बघून, आणि अजून अर्धा किमी दूर जाऊन अजून जास्त गर्दीत, उन्हात, रांगेत उभे राहून संगमाच्या मधोमध जाण्यासाठी होडी घेण्याची इच्छा नसल्यामुळे, आम्ही खालती सोमेश्वर घाटावर जाण्याचे ठरवले. पुन्हा एक दुचाकी वाहन केले, त्याने आम्हाला सोमेश्वर घाटावर सोडले. गेल्या महिन्याभरात गर्दी बद्दल काय काय ऐकले होते. पण आमच नशीब कि सोमेश्ववर घाटावर फारच तुरळक गर्दी होती. मी अजूनही ठरवले नव्हते कि नदीत पूर्ण बुडी मारायची कि नाहीं ते. पाणी फार घाण असणार, पाण्यात कचरा असणार असे विचार मनात घोळत होते. शहरात आयुष्य घालवलेला आणि दररोज शॉवर ने आंघोळ करणारा मी! तरी मी पाण्यात गेलो. माझ्या मुलाने मला गंगेचे पाणी आणायला सांगितले होते. विचार केला बुडी नाहीं मारली तरी आत जाऊन प्लास्टिक च्या बाटलीत त्याच्यासाठी पाणी भरून आणीन. हळू हळू मी आत आत जात होतो. पाणी दिसायला तरी स्वच्छ होते. थोडे प्लास्टिक चे तुकडे वाहत होते. गंगेत स्नान करायची  हि माझी पहिली संधी होती. 


देवि सुरेश्वरि भगवति गंगे त्रिभुवनतारिणि तरल तरंगे।

शंकर मौलिविहारिणि विमले मम मति रास्तां तव पद कमले ॥ १ ॥  (गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित) 

(सारांश: हे देवी गंगे, तू तिन्ही जगताची तारिणी आहेस, तू शंकराच्या जटेमधली विहार करणारी आहेस. आणि माझे मन, बुद्धी नेहमी तुझ्या कमलचरणी स्थिर असावेत.)

माझे गंगेचे धावते दर्शन फार पूर्वी झाले होते. आसाम च्या रस्त्यावर, ट्रेन पटण्याहून जाते. पटण्याला गंगेचे अती-विस्तृत पात्र आहे. ट्रेन पाच-दहा मिनिटे तो रेल्वे पूल ओलांडत होती. मी घाई-घाईने एक रुपया ट्रेन मधूनच खालती टाकला आणि नमस्कार केला होता. पण तीला त्याची फारशी आठवण असेल असे वाटत नाहीं. तीला म्हणजे, गंगेला! 

मी पाय रेटत  पुढे पुढे जात असतांना माझ्या उजव्या बाजूला एक महिला आंघोळ करीत होती. ती कोणाशी तरी बोलत होती. मी आधी फारसे लक्ष दिले नाहीं पण बाजूनी जातांना तिचे बोललेले ऐकू यायला लागले. मला आधी वाटलं फारच भावुक होऊन बडबड करत असावी. पण तसे नव्हते. ती गंगेशी संवाद करीत होती. "आज मेरा पहिली बार आपके यहां आना हुआ है| आपका दर्शन कभी नहीं हुआ था| अच्छा हुआ मुझे आपने बुला लिया " 

मी चकित होऊन ऐकू लागलो. माझी पाण्यात ओढत चाललेली पाऊले संथावली. 

"मुझे बहोत अच्छा लग रहा है आपसे मिल के, आपका दर्शन ले के| मैं बहुत खुश हुं|" असे काहीसे बोलत ती गंगेत बुड्या मारीत होती. तिचा गंगेशी चाललेला संवाद असेल, आजूबाजूला अथांग पसरलेला मानवतेचा सागर असेल, कोणाचीहि वाट न बघता, अविरत, अखंड वहाणारी गंगा असेल, पण मला भरून आले.  

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।

अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ ११ ॥

(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)

(सारांश: हे गंगे, तुझ्या काठचा मी कासव असलेलं मला चालेल, तुझ्या पाण्यातला मासा बनलेलं मला चालेल किंव्हा तुझ्या काठी साधारण आणि क्षीण सरड्याचे अस्तित्व सुद्धा मला चालेल. तुझ्या काठी एखाद्या दीन, हीन  कुळातील व्यक्ती म्हणून माझा जन्म झालेला चालेल पण तुझ्या काठापासून दूर कुठल्या राज्याच्या राजपद सुद्धा मला नको.)  

मी काही अंतर चालत जाऊन 'बुडू, बुडू गंगे' म्हणत तीन बुड्या मारून स्नान केले. पाणी गार, आल्हादायक होते. तिसऱ्या बुडी नंतर मला एकदम शांत आणि प्रसन्न वाटायला लागले. आजूबाजूचा कोलाहल कमी ऐकू येऊ लागला. मनातला कोलाहल हि कमी कमी झाला. स्वतःचे श्वास ऐकू येऊ लागले. मगाशी दिसलेल्या बाई सारख मी पण गंगेशी गप्पा मारू शकत नाहीं या उणिवेची जाणीव झाली. भक्तीत एवढा ठामपणा नाहीं. एवढी शक्ती नाहीं. पण गंगेला त्याचे काही नाहीं. तिने तेवढ्याच प्रेमानें मला कवटाळले होते.  

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु || ५२|| 

(गंगा लहरी, जगन्नाथ पंडितराज)

राजा भगीरथाने हजारो वर्षांपूर्वी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली अशी गोष्ट आहे. गंगा स्वर्गातून आली कि नाहीं हा आस्थेचा प्रश्न आहे पण हजारो वर्ष स्वर्गातल्या अमृताचे काम गंगा अविरत करीत आहे. आपली संस्कृतीला जन्म देणारी आणि आपण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करण्याची क्षमता असलेली गंगा, आपल्या सनातन धर्माची केंद्रबिंदू आहे.

रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् ।

त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ ९ ॥

(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)

मृत्यूसमयी गंगेचे दोन थेंब प्राशनास देतात तर मृत्यूनंतर अस्थी विसर्जनही गंगेतचकरतात. काशीला, मनकर्णिका घाटावर तर मृत्यूसुद्धा गंगेकिनारी व्हावा यासाठी ताटकळत असतात. अश्या या गंगामाईच्या धारेत मी न्हात होतो. अविस्मरमणीय, अलौकिक आणि शब्दात पकडण्यासाठी अशक्य असा हा अनुभव होता. माझ्या सारखे करोडो लोक जीवाची पराकाष्ठा करून प्रयागराज ला येत होते. बाहेरून बघता करोडो लोकांची गर्दी दिसत असेल पण त्या गर्दीत, गंगेत उभे असतांना फक्त तुम्ही आणि गंगेचे खळखळते पाणी. या अत्यंत वैयक्तिक अनुभवासाठी जनसमुदाय लोटत होता. लहान-मोठे, स्त्री-पुरुष, तरणे-ताठे, गरीब-श्रीमंत, हेलिकॉप्टर-विमानाने, ट्रेन, घोडे-गाड्यांनी, आणि शेवटी तर पायी, पण गंगेकिनारी पोचत होते. कारण गंगेसाठी सगळे सारखेच. मला मोक्षासाठी मध्यस्थीची आणि मध्यस्थांची आवश्यकता नाहीं, माझ्या मोक्षाची जवाबदारी माझीच आणि त्यासाठी गंगा मदतीस धावत येणार हि भावना अगदी तळा-गाळापर्यंत रुजली आहे. त्यामुळे कुठल्याही निमंत्रणाशिवाय पन्नास  करोड लोक महाकुंभला आलेत. अश्या भूमीत, धर्मात आणि संस्कृतीत जन्म मिळाला हे अहोभाग्यच. 

स्नान करून आम्ही लगेच प्रयागराज सोडले. आपली संख्या कमी करून, येणाऱ्या लाखों साठी थोडी जागा केली. थोडीशीच. तेवढेच खारीचे योगदान. 

प्रयागराजचा ११०० कि.मी चा कार चा प्रवास करण्यात बरीच दगदग झाली होती आणि परतीचा प्रवास शिल्लक होता पण मन प्रसन्न होते. संगम स्नान, गंगास्नान झालेच पण अखिल भारतीय समाजाचे दर्शन झाले. मी नवव्या इयत्तेत असतांना NCC तर्फे आसाम ला जायची संधी मिळाली होती. ट्रेन मधून चार दिवस प्रवास करतांना भारताचे जे दर्शन झाले त्याचे पडसाद आणि त्याचे प्रतिसाद २८ वर्षे झालीत पण माझ्या मनात आणि माझ्या व्यक्तिमत्वावर अजूनही आहेत. यंदाचे दर्शन फार वेगळे होते. भारत बदलला आहे. आता देश प्रगतीच्या ठाम मार्गावर वेगाने पुढे जातोय. या प्रवासाची, समाज दर्शनाची,  या अनुभवाची अवीट गोडी उरलेला जन्मभर राहील एवढे नक्की.  

2/3/25

थोरले बाजीराव आणि 'मल्हारी'


नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी चालू होती. सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. गाणी जोरजोरात वाजत होती. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी मजा करीत होतो. आता नाचायचे म्हंटले कि एकूण धांगड-धिंगा वाली गाणीच लागणार. वाद्ये, आवाज, नृत्य सगळे एकदम भन्नाट हवे. तशीच गाणी वाजत होती. तेवढ्यात 'बाजीराव-मस्तानी' या सन २०१५ सालच्या हिंदी चित्रपटातील 'मल्हारी' हे गाणे लागले. समोर टी.व्ही. वर चित्रपटातील थोरल्या बाजीरावांची भूमिका वठवीत रणवीर सिंग जोरजोरात नाचत होता. उत्तम नट आणि उत्तम नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंग याने या गाण्यात अतिशय उत्तम नाच केला आहे. गाण्याची चाल हि कर्णवेधक आहे. हिंदी चित्रपटात गेल्या काही दशकात विषय काही हि असो पण एक धांगड-धिंगा वाले  गाणे असतेच. निर्मात्यांचा मत असे कि काही नाहीं तर हे गाणे बघायला लोक येतील. यात किती तथ्य आहे खुद्द निर्माता आणि देव जाणो पण साधारण या गाण्यांमध्ये तुरळक वस्त्रात नट्या असतात. आपण मराठी लोकांचे नशीब खरे कि निदान 'मल्हारी' गाण्यात असे चित्त-चक्षु 'चमत्कार' नव्हते. आणि मुख्य भूमिकेतील नटच नृत्य करीत होते. 

मी हा चित्रपट बघितला नाहीं. चित्रपट परीक्षण हा या लेखाचा उद्देश्य नाहीं. चित्रपटाचे विविध आढावे वाचलेत किंव्हा ज्यांनी चित्रपट बघितला आहे त्यांच्याशी बोललो तर चित्रपट चांगला आहे अशीच साधारण प्रतिक्रिया मिळाली आहे. पण तरी 'मल्हारी' गाणे बघून काहीतरी चुकल्यासारखे झाले. थोडे वाईट वाटले. थोरले बाजीराव हे काय व्यक्तिमत्व होते, त्यांचा अतुलनीय पराक्रम, अचाट कर्तृत्व, त्यांचा दरारा, त्यांचा अख्ख्या हिंदुस्तानात दबदबा याचा सगळा विचार केला तर छत्रपती शिवाजींचा जणू वारसा लाभलेला आणि त्यांच्या नंतर मराठा साम्राज्याचा अजिंक्यतारा, अश्या तऱ्हेचे हेंगडे-फेंगडे नृत्य त्याच्या सैनिकांसोबत करीत असेल हि कल्पना करवीत नाहीं. थोरले बाजीराव हे नुसते सेनापती नक्कीच नव्हते. त्यांची पथके त्यांच्या निवडक सैनिकांची होती. त्यांच्या स्वाऱ्या म्हणजे कासवाचे पाठीवरचे घर असे. अगदी निवडक तंबू आणि बाकी सैन्य उघड्यावरच असे, कारण एकदम आवरून निघायचे तर १०-२० हजार सैनी जलद गतीने निघू शकत. थोडक्यात थोरले बाजीराव आणि त्यांच्या सैनिकांची जवळीक असणार पण म्हणून 'मल्हारी मल्हारी' गात ते त्यांच्या सोबत उड्या  मारीत नसणार.

                                     

सन १७३७-३८ च्या त्यांच्या दिल्लीच्या मोहिमेत त्यांनी थेट दिल्लीच्या पालिका बाजारात मुक्काम केला होता. दिल्लीत धावपळ उडाली. दिल्लीच्या कट-पुतळी बादशहाची पूर्णपणे सटारली. त्याच्याकडे न सैन्य होते ना त्याने कधी म्यानातून तलवार बाहेर काढली होती. आणि जरी त्याच्या बाहुत थोडा दम जरी असला तरी समोर बाजीराव! त्याने आपले मंत्री-संत्री पाठवून थोरल्या बाजीरावांचे स्वागत केले. काय हवे त्याची विचारपूस केली. सैन्य सुद्धा जमविण्याचा प्रयत्न केला पण थोरल्या बाजीरावाशी लढण्याची उत्सुकता कोणी दाखविली नाहीं. थोरल्या बाजीरावांनी तिथून सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना संदेश पाठवला कि त्यांचा हुकूम असेल तर ते स्वतः दिल्लीचे तख्त मोडतील आणि मग छत्रपती शाहूमहाराज संपूर्ण भारताचे छत्रपती म्हणून आरोहण करू शकतात. आता शोकांतिका वेगळी कि छत्रपती शाहूमहाराजांनी याला संमती दिली नाहीं आणि तख्त तोडायलाही परवानगी दिली नाहीं. पण थोरल्या बाजीरावांच्या जीवनातील हि एक घटना त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची मर्दूमुकी दर्शविते. त्यांच्या जीवनातात अश्या असंख्य घटना आहेत. वीस वर्षात अर्ध्याहून जास्त भारत पादाक्रांत करून जिंकणे काय सोपे आहे का? 
--
हिंदी सिनेमामध्ये काही प्रसंग दाखवावेच लागतात. जुन्या काळात एक मुसलमान पात्र हवेच आणि ते मुसलमान पात्र सगळ्यात प्रामाणिकच दाखवायला हवे. नंतरच्या काळात हेंगडे-फेंगडे नाचणारी एक नटी हवी आणि ती नटी फक्त नाचासाठी असे. सिनेमाची प्रमुख भूमिका करणारी नटी वेगळीच. गेल्या काही वर्षातील नवीन कल म्हणजे प्रमुख भूमिकेतील नटच जोरदार नृत्य सादर करतात. या गाण्याचा कथानकाशी संबंध नसतो पण गाणे दृक-श्राव्य असते आणि त्या गाण्याला घेऊन चित्रपटाची जाहिरात केली जाते. अपेक्षा अशी कि सगळ्या घरांमध्ये, फोने वर, पार्ट्या आणि कल्ब्समध्ये हे गाणे वाजेल आणि चित्रपट चालायला हातभार लागेल. आता हा नियम बहुतांश सगळ्या चित्रपटांना लागू होत असेल तर थोरल्या बाजीरावांच्या चरित्रात्मक चित्रपटावरही लागू होणारच. विषय जिव्हाळ्याचा असला, चित्रपटाच्या नायकाबद्दल अपार आदर असला तरी शेवटी चित्रपट आजच्या जमान्यातील आहे आणि चित्रपट चालणे आवश्यक आहे. मग त्यासाठी 'मल्हारी' आपण सहन करायचा. हिंदी चित्रपटातील पैसे, सेट्स आणि इतर गोष्टी, ज्याने चित्रपट भव्य-दिव्य होतो त्या गोष्टी मराठी चित्रपटात आणणे कठीण आहे. आणि दुसरे म्हणजे हिंदी चित्रपट ६०-७०% भारतात बघितल्या जाऊ शकतो. म्हणजे थोरल्या बाजीरावांची ओळख पुन्हा बहुतांश भारताला होईल. येन-तेन कारणेंन, आजच्या काळात थोरल्या बाजीरावांची गाथा गाणे आवश्यक आहे. 

आता एखादं-दुसरे गाणे सहन करायचे कि अजूनही काही सहन करायचे? श्री गोवारीकर यांने अकबरावर चित्रपट काढला आणि अकबराला ह्रितिक रोशन सारखे सुंदर दाखविले (तेंव्हा काढलेल्या चित्रांवरून तरी अकबर किंव्हा कुठलाही मोघल इतका सुंदर असेल असे वाटत नाहीं) आणि जोधाला, त्याची प्रियकर दाखविले. सत्य परिस्थिती हि होती कि आपले राज्य टिकवायला, एक करार म्हणून जयपूरच्या मानसिंगाने आपली बहीण अकबराला दिली. अकबराच्या हारेम मध्ये शेकडो बायका होत्या, त्यात अजून एक जोधा दाखल झाली. दीडशे वर्षांनी जेंव्हा औरंझेब दख्खनी कफल्लक होऊन मेला तेंव्हा जयपूरच्या तेंव्हाच्या राजाने दिल्ली ला दौड मारली आणि तिथल्या राजपूत बायकांना सोडवून पुन्हा जयपुरी घेऊन आला. आणि त्यानंतर त्या घराण्याची कुठली स्त्री पुन्हा मोघलांकडे गेली नाहीं. तसेच हरियाणाच्या जाट राजाने सन १६८८ ला अकबराला जेथे दफनवले आहे तेथे हल्ला करून त्याची कबर खोदली. अकबराची हाडे काढून जाळलीत. अकबर हा 'the great ' कधीच नव्हता पण श्री गोवारीकरांनी त्या इस्लामी आक्रमकाचे उद्दात्तीकरण केलेला चित्रपटही सहन करायचा का? मला माहिती नाहीं. पण चित्रपटाच्या निमित्ताने झालेला वादामुळे अकबराला किंव्हा मोघलांच्या उद्दात्तीकरणाला आळा बसायला सुरुवात झाली. 
--
हा लेख लिहितांनाच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधार 'छावा' चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाले. त्यात स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना लेझीम खेळतांनाचे दृश्य आहे. ते बघून मन विचलित झाले. शंभू राजे, जे पाच-पाच शत्रूंना छातीवर घेऊन ९ वर्षे अखंड लढत होते त्यांना नृत्य करतांना दाखवायची खरंच मुळीच आवश्यकता नाहीं. पण हे दृश्य वगळता, चित्रपटाचे ट्रेलर बघून अंगावर काटा आला. प्रमुख भूमिकेतील विक्की कौशल यांनी छत्रपतींची भूमिका अप्रतिम निभावल्याचे दिसते. 'पार्वती पतये नमः, हर हर महादेव' हि गर्जना संभाजी महाराज करतानांचे दृश्य बघून रोम-रोमात स्फूर्ती येते. आणि आता छत्रपती संभाजी महाराजांची ओळख भारताला होणार आणि मोघली औरंग्याच्या खरा (घाणेरडा) चेहरा पुन्हा दिसणारा याचे समाधान वाटते. 

पण चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मनापासून विनंती- लेझीम-बिझीम वाला सीन कापा. गरज नाहीं.  

1/13/25

श्रीकृष्ण विराट रूप दर्शन

श्रीकृष्णाचा विराटरुपाचे महाभारताच्या उद्योग पर्वात वर्णन केले आहे. उद्योग पर्वात अनेक उप-पर्व आहेत. त्यात भागवतयान पर्वात श्रीकृष्ण विराटरूप दर्शवितो. श्रीकृष्ण शिष्टचारासाठी कुरुसभेत पांडवांचा प्रतिनिधी म्हणून जातो. हा शिष्टाचार, ज्याला आपण इंग्रजीत 'डिप्लोमसी' असे म्हणतो, म्हटले तर सरळ होता आणि म्हटले तर क्लिष्ट होता. कृष्णाने या विषयावर पांडवांसोबत बरीच चर्चा केली. कृष्णाने प्रत्येक पांडवाचे मत घेतले, द्रौपदीचे मत घेतले, त्यांच्या गटातील थोर-मोठ्यांचे मत घेतले. हे सर्व संवाद उद्योग पर्वात टिपलेले आहेत. युधिष्टिराचे विचार किंव्हा अर्जुनाचे विचार विस्तृत प्रस्तुत केले आहेत. भीमाला भीमसेन असे संबोधिले आहे आणि त्यानेसुद्धा आपले मत प्रदर्शन विस्तृतपणे केले आहे. पुढे नकुल आणि सहदेव पण बोलले आहेत. अर्थात, कृष्णाचा कल शांतिप्रस्तावाकडेच होता. आणि विचार-विनिमयाद्वारे त्याने सगळ्यांना शांतिप्रस्तावाकडेच वळविले. 

कुशस्ठलं वृकस्ठलमासम्दी वारणावतं ।

अवसानं च गोविंद किं चिदेवात्र पंचमं  ॥

शेवटी युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला कि गोविंदा, कुशस्थलम, वृकस्थलम, मसंडी, वारणव्रतम आणि अजून एखादे मिळून पाच गावे मिळालित तरी आम्ही ती आनंदाने घेऊ. हाच प्रस्ताव पुढे कृष्ण हस्तिनापूर सभेत धृतराष्ट्रा समोर ठेवतो.   

कृष्ण नीती शब्द बऱ्याचदा वापरल्या जातो. कृष्ण फार हुशार होता, दूरदृष्टा  होता हे जेवढे खरे तेवढेच हे पण खरे कि त्याने एकट्याने व एकट्यासाठी कधीच कुठले पाऊल उचलले नाहीं. नेहमी सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसोबत तो राहिला आणि सगळ्यांना घेऊन पावले उचलली. 

कृते मंत्रप्रयोगें, त्रेतायाम तंत्रसाधने, 

द्वापरे व्यूहरचने शक्ती, संघे कलौ युगे।

वरील श्लोकाचा अर्थ असा कि कृत युगात मंत्रांना शक्ती होती, त्रेता युगात तंत्रांना शक्ती होती, द्वापार युगात (म्हणजे महाभारत युगात) व्यूह रचनेला शक्ती होती तर कली युगात संघटनेला, एकीला, समुदायाला शक्ती असेल. (हा श्लोक महाभारतातील नाहीं) थोडक्यात असे म्हणायला हरकत नाहीं कि जरी कृष्ण व्यूह रचत असला तरी येणाऱ्या कली युगात काय आवश्यक आहे याची गुरुकिल्ली तो आपल्याला देत होता. (युधिष्टिराच्या राज्यारोहणानंतर ३६ वर्षांनी कली युग सुरु झाले) 

पांडवांच्या तंबूत विचारविनिमय आटपून शांतिदूत म्हणून श्रीकृष्ण जेंव्हा हस्तिनापुरात दाखल झाला तेंव्हा हस्तिनापुरातील थोर-मोठ्यांमध्ये बरीच धांदल उडाली. त्याचे येणे अपेक्षितच होते पण तरी त्याची दिव्यता, त्याची गूढता, त्याच्यावरची श्रद्धा याचे मिश्रण सामान्य नागरिकांमध्ये असणार तर कृष्णाबद्दलचा आदर, त्याची भीती,आणि त्याच्या द्वेष या सगळ्याचे मिश्रण कुरुसभेत दिसून येते. विदुर आणि भीष्म कृष्णाच्या दिव्यतेत आणि भक्तीत  नहात होते तर शकुनी बहुधा भीतीत आणि दुर्योधन द्वेषात. 

अग्रतो वासुदेवस्य कर्णदुर्योधनावुभौ  ।

वृष्णयः कृतवर्माच आसन्कृष्णस्य पृष्ठतः ॥

अर्थात - वासुदेवाच्या पुढे कारण आणि दुर्योधन चालत होते तर वासुदेवाच्या मागे कृतवर्मा आणि वृष्णी (सात्यकी) चालत होते. पण एकूण हस्तिनापुर नगरीत फार उत्सुकता होते श्री कृष्णाच्या आगमनाने.  महर्षी व्यास लिहितात:

अद्भुतं महदाश्चर्यं श्रूयते कुरुनंदन 

स्त्रीयो बालाश्च वृद्धाश्च कथयान्ति गृहे गृहे।। (अध्याय ८३, ००३) 

कृष्णाच्या हस्तिनापूर सभेतील शांतिप्रस्ताव हा प्रसंग अद्भुत आहे. बी. आर. चोप्रा यांचे सुप्रसिद्ध महाभारत बघितले (८०च्या दशकातील) तर हि घटना एका तासात होते. कारण मुख्य पात्रे या प्रसंगात बोललेली दाखवली आहेत. मूळ महाभारत वाचलेत तर मुख्य पात्रे या प्रसंगी  नक्कीच बोलतात पण यात अजून भरपूर गोष्टी घडतात. बरेच लोक बोलतात, वाद होतात. सभेच्या सुरुवातीला धृतराष्ट्र सभा संबोधितो मग विदुर बोलतो. आणि मग दुर्योधन सभेस आणि कृष्णाला संबोधितो. सगळे कृष्णाची स्तुतीच करतात. अगदी दुर्योधनही कृष्णासाठी स्तुतीपर शब्द बोलतो.  

स हि पूज्यतमो देव: कृष्ण: कमललोचनं।

त्रयणामपी लोकानां विदितां मम् सर्वथा।। (अध्याय ०८६, ००५)     

मग पुढल्या बऱ्याच उप-पर्वात कुरुसभेत भरपूर लोक या प्रस्तावावर मत-प्रदर्शन करितात. सभेत नारद ऋषी, कण्व ऋषी आणि राम नावाचे अजून एक ऋषी आपल्या दृष्टीने शांतीचा संदेश धृतराष्ट्र आणि दुर्योधनास देतात. राम ऋषी एक गोष्ट दुर्योधनास सांगतात ज्याचा सारांश असा कि दुर्योधनाने दंभ सोडून जे धर्म सांगतो ते करावे अन्यथा त्याची परिणीती सर्वनाशात होईल. पुढे गालव ऋषिंचाही संवाद आहे. गालव ऋषी हे विश्वामित्रांचे शिष्य. हे एकदम कुठुन अवतरले मला नेमके उमजले नाहीं. माझा संस्कृत चा अभ्यास एवढा नाहीं. विदुर, भीष्मपितामह, द्रोण आणि गांधारी आणि कुंती पण शांती प्रस्ताव मान्य करायचा आग्रह धरतात. पण दुर्योधनाने ठरवले होते कि तो सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा पांडवांना देणार नाहीं. 

महाभारतातील प्रत्येक प्रसंग विविधरंगी आहे. त्यात शिकण्यासारखे बरेच आहे. संपूर्ण सभेत एकाच व्यक्तीने युद्धाचा निर्णय घेतला होता त्यामुळे युद्ध होणारच होते हि घटना संघटनेतील जवाबदारीच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवाबदाऱ्या सोडल्यात कि काय होते याचे ज्वलंत उदाहरण आहे. भीष्म, द्रोण, विदुर किंव्हा कृपाचार्यांची निष्ठा राजाला होती, राज्याला नाहीं. आणि धृतराष्ट्राची  सुद्धा निष्ठा त्यांच्या पुत्रासाठी होती, राज्यासाठी नाहीं. थोडक्यात राज्यकर्ते राज्यासाठी तत्पर नव्हते त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम राज्याला भोगावे लागणारच होते. श्री कृष्ण हे जाणून असतो आणि केवळ त्यालाच हे दिसत असते असे नाहीं हे सभेत झालेल्या संवादावरून, वाद-विवादांवरून  दिसते पण म्हणूनच हा नर-संहार थांबवायला श्रीकृष्ण अतोनात प्रयत्न करितो. कृष्णाचा पूर्ण जन्म लोकांना अपेक्षित धर्मपथावर चालविण्याच्या खटाटोपात गेला पण दुर्योधन असो कि धृतराष्ट्र, किंव्हा मग तो कर्ण असो, त्याच्या हाती अपयशच आले. कुरुसभेतही तो धर्माबद्दल बोलला, अपेक्षित जवाबदाऱयांबद्दल बोलला पण ते सगळे उलट्या घड्यावर पाणी ठरले. 

शेवटी काही कमी असेल तर दुर्योधनाने स्वतःच्या अपार बुद्धिमत्तेची पावती देत कृष्णास बंदी बनवण्याचा निर्णय घेतला. तो कृष्ण होता ते पुढे पण सर्वप्रथम तो एक शांतिदूत होता, त्यामुळे त्याला बंदी करणे अधर्म होता. एका शांतिदूताला आणि शांतिदूत म्हणून आलेल्या कृष्णाला बंदी बनवण्याचा निर्णय घेऊन दुर्योधनाने आपल्या रक्तरंजित भविष्याकडे पाऊले उचलली होती. दुर्योधनाचा हा क्रोध आणि त्यांनी मांडलेली चेष्टा बघून धृतराष्ट्राने सुद्धा त्याचा अक्षरशः धिक्कार केला आणि त्याला समजविण्याचा अतोनात प्रयत्न केला. विदुर आणि गांधारी सुद्धा दुर्योधनावर रागावले आणि त्याला कृष्णाची महिती दर्शवून घाबरविण्याचा प्रयत्न केला. 

प्रधर्षयन्महाबाहुं क्रुष्णमक्लिष्टकारीणम|

पतंगाग्नीवसाद्या सामात्यो ना भविष्यसि|| अध्याय १२८, ५२||

अर्थात, या उत्तम कार्य करणाऱ्या महाबाहू कृष्णाचा तू अपमान केलास तर पतंग जसे आगीत पडून नाहीसे होतात तसेच तू आणि तुझे मंत्री मंडळ सुद्धा भविष्यातून नाहीसे होतील.  

पण दुर्योधन हा केवळ युवराज होता, राजा नाहीं. हे लक्षात घेता त्याने दिलेल्या आदेशाला काडीमात्र महत्व नको. पण सत्य परिस्थिती अर्थातच वेगळी होती आणि राजा काय आणि युवराज काय, सभा दुर्योधनच चालवीत होता आणि त्याचा प्रत्यय त्याने द्रौपदी वस्त्रहरण करून दिलाच होता. 

अश्या परिस्थितीत कृष्णाने आपले विराटरूप धारण करण्याचा निर्णय घेतला. 

एकोहमिति यन्मोहान्मन्यसे मां सुयोधना|

परिभूय च दुर्बुद्धे ग्रहीतुं मां चिकिर्षसी || (अध्याय १२९, ०२)

अर्थात, अरे मूर्ख सुयोधना (कृष्ण त्यास सुयोधन म्हणतॊ, दुर्योधन नाहीं), तुला वाटते आहे कि मी येथे एकटा आलो आहे म्हणून तू मला बंदी बनविण्याची स्वप्ने बघतो आहेस. 

इहैव पांडवा: सर्वै तथैवान्धकवृष्ण्य:|

इहादित्याश्च रुद्राश्च वसवश्च महर्षीभी:|| (अध्याय १२९, ०३) 

अर्थात, पण तुला माहिती नाहीं या कि सगळे पांडव, अंधक आणि वृष्णी इथेच आहेत. आणि आदित्य, रुद्र, वसावा आणि महर्षी सुद्धा येथेच आहेत. 

आणि असे म्हणून श्रीकृष्णाने हास्याचा गडगडाट केला आणि विराटरूप धारण करू लागला. त्याच्या कांतीतून ब्रह्मादिक देव दिसू लागले, त्याच्या आगीच्या जणू ठिणग्या बाहेर पडू लागल्या. त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव व वक्षस्थळी रुद्र दिसू लागले.  

कृष्णाचे रूप आता हळू हळू अधिकाधिक भीतीदायक होऊ लागले. हे रूप म्हणजे शक्तिप्रदर्शन होते. पण हि दैवी शक्तीचे नाहीं,  हे भौतिक शक्ती प्रदर्शन होते. आणि श्रीकृष्णाचे वैयक्तिक शक्ती आणि कौरवांना लौकरच रणांगणात दिसणाऱ्या धार्मिक शक्तीचे प्रदर्शन होते. 

प्रदूरास्ताम तथा दोभ्यांर्याम सङ्कर्शण् धनञ्जय। 

दक्षिणेथार्जुनो धन्वी हली रामश्च सव्यत।। ( अध्याय १२९, ००७) 

भीमो युधिष्ठिरश्चैव मद्रिपुत्रौ च पृष्ठ। 

अन्धका वृष्णयश्चैव प्रदुम्नमुखास्तत।।  (अध्याय १२९, ००८) 

श्रीकृष्णाच्या दोन्ही हातातून बलदेव आणि अर्जुन प्रकट झालेत. अर्जुन त्याच्या धंयश्यासोबत श्रीकृष्णाच्या उजव्या हाताला तर बलदेव (बलराम) डाव्या हाताला होता (००७). युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव श्रीकृष्णाच्या पाठीशी तर अंधक, वृष्णी, प्रद्युमन इत्यादी त्याच्या समोर उभे ठाकलेले दिसले. (००८) 

पुढे त्याचे रूप अक्राळ-विक्राळ होऊ लागले. त्याच्या हजार हातात अनेकविधी शस्त्रे उत्पन्न झालीत. त्याच्या नासिक आणि कानातून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्यात आणि श्रीकृष्णाच्या रोमरोमातून सूर्यकिरणे प्रकट होऊ लागलीत. सभेतील सगळे रथी-महारथी गांगरून गेलेत आणि घाबरून त्यांनी सगळ्यांनी डोळे मिटून घेतलेत. फक्त, द्रोण, भीष्मपितामह, विदुर, संजय आणि उपस्थिती तपस्वी ऋषींना मात्र विराटरूपाचे दर्शन घेता आले. कारण त्यांना श्रीकृष्णाने दिव्य-दृष्टी दिली होती. 

असे महाकाय रूप धारण करून पुढे श्रीकृष्णाने सभा सोडली. त्याचा रथ त्याची वाट बघत होता आणि त्यावर आरोहण करून तो त्याच्या आत्या-कुंती कडे निघून गेला. 

विराटरूपात श्रीकृष्णाला दुर्योधनाला त्याची क्षुल्लुकता तर दाखवायची होतीच पण त्याला घाबरवायचे पण होते.  'तू मला बंदी करणार? आणि करायचे असले तर कसे करणार?' आणि नुसते दुर्योधनच नव्हे तर समस्त कौरव आणि कुरुसभेला त्याला दर्शवायचे होते कि युद्ध निरर्थक आणि आत्मघातकी आहे. पण 'विनाशाय विपरीतबुद्धी' हेच खरे. 

---

या लेखाची सुरुवात श्री रामधारी सिंग 'दिनकर' यांच्या 'रश्मीरथी' महाकाव्याच्या वाचनाने झाली. 'दिनकर' हे हिंदी कविसृष्टीतील आणि साहित्यसृष्टीतील 'महारथी' मानल्या जातात. त्यांनी कर्णावर रश्मीरथी हे काव्य लिहिले. हिंदीतील हे काव्य वाचायला सोपे आहे पण अर्थपूर्ण आहे. कर्णाचा जन्म, त्याची अगातिकता, त्याची निष्ठा, त्याची भ्रमित मनस्थिती, त्याच्या जीवाची घालमेल आणि शेवटी त्याने समजून-उमजून निवडलेला अधर्माचा मार्ग हे सगळे अतिशय सुरेल आणि सुरेखपणे श्री दिनकर यांने मांडिले आहे. त्यातील विराटरूपाचे वर्णन फार रोचक आहे. माझी मूळ कल्पना अशी होती कि संस्कृत मधील मूळ महाभारतातील श्लोक उद्धृत करायचे आणि मग श्री दिनकर यांची कविता प्रस्तुत करायची. पण कुठले पर्व, कुठले उप-पर्व आणि मग नेमके कुठले श्लोक यांच्या संशोधनात श्री दिनकर यांच्या कवितेची पाळी येईतोवर हजारहुन अधिक शब्द लागलेत. असो. वाचकांनी इथपर्यंत वेळ काढली असेल तर मी मनापासून विनंती करतो कि रश्मीरथीतील खाली उद्धृत केलेले विराटरूपाचे वर्णन अवश्य वाचावे. वेळ घेऊन वाचावे, घाई करू नये. लागेल तर टप्प्या-टप्प्यात वाचावे. 

मैत्री की राय बताने को, 

सबको सुमार्ग पर लाने को, 

दुर्योधन को समझाने को, 

भीषण विध्वंस बचने को, 

           भगवान हस्तिनापुर आये,

           पांडव का संदेसा लाये| 

"दो न्याय अगर, तो आधा दो, 

पर, इसमें भी यदि बाधा हो, 

तो दे दो केवल पांच ग्राम, 

रक्खो अपनी धरती तमाम |    

          हम वही ख़ुशी से खाएंगे, 

          परिजन पर ऐसी न उठाएंगे|" 

दुर्योधन वह भी दे न सका, 

आशिष समाज की ले न सका, 

उलटे, हरी को बांधने चला, 

जो था असाध्य, साधने चला | 

           जब नाश मनुज पर छाता है, 

           पहले विवेक मर जाता है| 

हरि  ने भीषण हुंकार किया, 

अपना स्वरूप-विस्तार किया, 

डगमग -डगमग दिग्गज डोले, 

भगवान् कुपित होकर बोले - 

            "जंजीर बढ़ा कर साध मुझे, 

             हाँ -हाँ, दुर्योधन! बाँध मुझे |"

"यह देख, गगन मुझमे लय है, 

यह देख, पवन मुझमे लय है, 

मुझमे विलीन झंकार सकल, 

मुझमे लय  है संसार सकल|   

          अमरत्व फूलता है मुझमे, 

          संहार झूलता है मुझमे| 

"उदयाचल मेरा दीप्त भाल, 

भूमण्डल वक्षस्थल विशाल, 

भुज परिधि-बांध को घेरे है, 

मैनाक-मेरु पग मेरे है| 

           दिपते जो गृह-नक्षत्र-निकर, 

           सब है मेरे मुख के अंदर| 

"दृग हो तो दृश्य अकाण्ड देख, 

मुझमे सारा ब्रह्माण्ड देख, 

चर-अचर जीव, जग क्षर-अक्षर, 

नश्वर मनुष्य, सुरजाति अमर, 

         शत कोटि सूर्य, शत कोटि चंद्र, 

         शत कोटि सरित, सर, सिंधु, मन्द्र;

"शत कोटि विष्णु, ब्रह्मा, महेश, 

शत  कोटि जिष्णु, जलपति धनेश, 

शत कोटि रूद्र, शत कोटि काल, 

शत कोटि दण्डधर लोकपाल| 

        जंजीर बढ़ाकर साध इन्हे, 

        हाँ-हाँ, दुर्योधन! बाँध इन्हे| 

"भूलोक, अटल पाताल देख, 

गत  और अनागत काल देख, 

यह देख, जगत का आदि-सृजन , 

यह देख, महाभारत का रण;

       मृतकों से पति हुई भू है, 

       पहचान, कहाँ इसमें तू है 

"अम्बर में कुंतल-जाल देख, 

पद के नीचे पाताल  देख,

मुट्ठी में तीनो काल देख, 

मेरा स्वरूप विकराल देख| 

        सब जन्म मुझि से पाते है, 

        फिर लौट मुझि में आते है| 

"जिम्वा से कढती ज्वाल सघन, 

साँसों में पाटा जन्म पवन, 

पद जाती मेरी दृष्टी जिधर, 

हँसाने लगाती है सृष्टि उधर| 

          मै जभी मूँदता हूँ लोचन, 

          छा जाता चारो और मरण| 

"बांधने मुझे तो आया है, 

जंजीर बड़ी क्या लाया है?

यदि मुझे बांधना चाहे मन, 

पहले तो बाँध अनंत गगन| 

          सूने को साध न सकता है, 

          वह मुझे बाँध कब सकता है?

"हित - वचन नहीं तूने माना, 

मैत्री का मूल्य न पहचाना, 

तो ले, मै भी अब जाता हूँ, 

अंतिम संकल्प सुनाता हूँ| 

           याचना नहीं, अब रण होगा, 

          जीवन -जय या कि मरण होगा| 

"टकरायेंगे नक्षत्र-निकर, 

बरसेगी भू पर वन्ही प्रखर, 

फण शेषनाग का डोलेगा, 

विकराल काल मुँह खोलेगा| 

              दुर्योधन! रण ऐसा होगा, 

              फिर कभी नहीं जैसा होगा| 

"भाई पर भाई टूटेंगे, 

विष-बाण बून्द-से छूटेंगे, 

वायस-शृगाल सुख लूटेंगे, 

सौभाग्य मनुज के फूटेंगे | 

             आखिर तू भूशायी होगा, 

             हिंसा का पर, दायी होगा|" 

थी सभा सन्न, सब लोग डरे, 

कप ते या थे बेहोश पड़े| 

केवल दो नर न अघाते थे, 

धृतराष्ट्र-विदुर सुख पाते थे|   

            कर जोड़ खड़े प्रमुदित, निर्भय, 

            दोनों पुकारते थे 'जय-जय!'

--

१) मी श्री रामस्वरूप शर्मा, मुरादाबाद, यांचे मूळ संस्कृत महाभारताचे हिंदीत भाषांतर विषयाभ्यासाठी वापरले आहे. हे जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वी सनातनधर्म प्रेस, मुरादाबाद यांनी प्रकाशित केले होते. याची लिंक अशी: 

https://dn790007.ca.archive.org/0/items/in.ernet.dli.2015.540928/2015.540928.Mahabharat-Udyog.pdf 

२) कुरुसभेतील प्रसंगाचे चित्र हे मूळ श्री राजा रवी वर्मा यांचे आहे. माझ्यामते हे सध्या नेपिअर संग्रहालय, त्रिवेंद्रम मध्ये स्थित आहे. मी कुणाच्याही अनुमतीविना हे चित्र येथे वापरले आहे. पण सर्व हक्क संग्रहालय किंव्हा श्री राजा रवी वर्मा यांचे आहेत.