11/24/24

महाराष्ट्र कुणाचा?...जनता जनार्दनाचा!


या मथळ्याचा पहिला लेख मी २०१४ ला लिहिला होता. तेंव्हाचे भाजप आणि मूळ शिवसेनेतील द्वंद्व आणि त्याचा काँग्रेसला आणि श्री पवार यांना होणाऱ्या फायद्याची शक्यता हा त्या लेखाचा सूर होता. जनतेच्या कृपेने तसे झाले नाहीं. आणि भाजप आणि मूळ शिवसेना यांचे सरकार आले. पुढे श्री फडणवीस यांनी मोठ्या शर्थीने राज्य राखले आणि जोपासले. सन २०१९ च्या लोकसभेत भाजप ची ओटी मराठी जनतेने काठोकाठ भरली. त्या वर्षीच्याच विधानसभेत पुन्हा भाजप आणि मूळ सेनेचे सरकार येणार हे नक्की होते. पण नेमके तेंव्हाच श्री फडणवीस यांच्या कानात वारे गेले. आणि भाजप ची अक्कल चरायला गेली. पण स्वतःसाठी त्यांनी कमी जागा ठेऊन भाजप ने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जणू ठेचकाळयाला धोंडे भाजप आणि श्री फडणवीस शोधत होते. तरी जनतेने त्यांना तब्बल १२२ जागा दिल्यात. मूळ सेनेचे मुख्य श्री ठाकरे यांनी घातलेला गोंधळ बघता, भाजप वेळेत हि गाठ कापून मोकळे होऊन २०० होऊन अधिक जागांवर  लढले असते तर भाजप ला स्वतःच्या बळावरच पूर्ण बहुमत मिळाले असते. श्री ठाकरे आणि 'सेना धुरंधर' श्री संजय राऊत यांनी पायाखालून पाट काढे पर्यंत भाजप ने वाट बघितली.  आता अंगठे ठेचकाळलेत तो पर्यंत ठीक होत पण  भाजप आणि श्री फडणवीस यांनी ठरवले कि धोंडे शोधून त्यावर डोकी आपटायचीत. ३ दिवसांसाठी श्री अजित पवार यांचा पदर धरून त्यांनी घाई-घाईत लग्न लावण्याचा प्रयत्न केला. लग्नातली पोरगी कधीच पळून गेली आणि घोड्यावर बसलेले भाजप मात्र त्या नंतर लग्नाचा हिशोब चुकवीत बसलेत. मग भाजप आणि श्री फडणवीस यांनी शक्कल लढवली आणि मूळ सेनेच्या बुरुजांखाली सुरुंग लावले. आणि श्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून पुन्हा सत्तारूढ झालेत. शांतपणे राज्य करून, विकासाची दारे उघडणे सोडून, भाजप आणि श्री फडणवीस यांनी श्री अजित पवार यांच्यासाठी दारे उघडावीत,  या शंखपणाला काय म्हणायचे? त्यांच्या या कृतीचा उपयोग नेमका कोणाला झाला हे मला अजूनही उमगले नाहीं. सन २०१९ च्या निवडणुकीत श्री पवार आणि त्यांच्या पक्षाला सगळ्यात कमी जागा आणि मते मिळाली असतांना बुडत्याला हातची वल्ही देऊन हाताने होडी ढकलण्यात भाजप ला नेमके काय मिळाले? 

गेल्या दशकातील आणि मुख्य करून २०१९ च्या या महाराष्ट्रातील राजकारणाचा हा संक्षिप्त आढावा देण्यामागचे कारण असे कि या सगळ्या कोलांट्या उड्यात जनतेचे नुकसान झाले. जनतेने आपला कौल २०१४ पासून एकाच पक्षाला देत असतांना त्यांनी (म्हणजे भाजप आणि श्री फडणवीस) एका पाठोपाठ एक नव-नवीन राजकीय चुका कराव्यात हि खेदाची बाब आहे. आणि म्हणूनच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि श्री फडणवीस यांच्या डोक्यावर जनतेने सणसणीत टोला हाणला असे म्हणायला हरकत नाहीं.  

राज्यात गेले पाच वर्षे राजकीय अस्थिरता होती त्याचे पडसाद आणि प्रतिसाद राज्यकारभार आणि प्रशासनावर नक्कीच पडले असणार. केवळ राजकीय किंव्हा निव्वळ निवडणुकीसाठी फायदा होईल अशी पावले न उचलता दूरदृष्टीने राज्य विकासासाठी पावले उचलल्या गेल्याची किती शक्यता आहे? आणि असे आवश्यक निर्णय घेतल्या गेले नसतील कारण त्या साठी फुरसत नसेल किंव्हा लक्ष फक्त येत्या निवडणुकांकडेच असेल तर या साठी जवाबदार कोण? याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.  

अशी प्राप्त परिस्थिती असली तरी भाजप आणि श्री फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे हे पण तेवढेच सत्य आहे. श्री फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी आहेतच पण उत्तम राज्यकारभारी पण आहेत. त्यांना प्रशासनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. नागपूरचे ते सगळ्यात तरुण महापौर होते. मग गेले पंचवीस वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद फार उत्तमरीत्या निभावले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासात श्री वसंतराव नाईक यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद टिकविणारे दुसरेच मुख्यमंत्री आहेत. 

आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इतका अनुभव असतांना आणि तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळाला असतांना भाजप ने श्री फडणवीस यांना पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करून जनतेवर कृपा करावी. अडीच वर्ष एक आणि मग दुसरा इत्यादी दिवाळखोरी विचार पक्षाने करू नये. श्री फडणवीस यांच्या सारखा अनुभवी राज्यकर्त्यांची राज्याला फार आवश्यकता आहे. पाच वर्षे आता फक्त विकास एवढाच मुद्दा समोर ठेऊन भाजप आणि श्री फडणवीस राज्य करतील हि आशा. 

11/2/24

पु. ल. - एक साठा (भाग २)

(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करीत आहे. पहिला भाग आपल्याला इथे वाचता येईल.) 

पु.ल. च्या या लेखनात दोन प्रकारचे आढळतात. पहिला प्रकार ज्यात त्यांनी विचार हे सांप्रत परिस्थितीवर भाष्य, विनोद आणि स्वतःचे त्या विषयावरील विचार आणि समाजासाठी लिहिलेले लेखन. आणि दुसरा प्रकार हा आत्मा-प्रवास आणि मनोगत याचे मिश्रण. "राहून गेलेल्या गोष्टी' हा लेख त्यांचा वैयक्तिक लेख म्हणता येईल. 

"माणसाचा वय जसजसं वाढत जात तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या, यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपुट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल अस नाहीं मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाहीं. आता कासर आपल्या एकट्याच्याच हाती नाहीं हे ध्यानी येतं, आणि गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागत" 

त्यांना लहान मुलांना - पोरं-टोरांना, संगीत शिकवायचा राहून गेला हे मला अनपेक्षित होते. पु. ल हे साहित्यिक नंतर संगीतवेडे आधी होते त्यामुळे त्यांना असे वाटणे याचे आश्चर्य वाटायला नको. पण या गोष्टीचा त्यांना खेद वाटणे यात त्यांच्या मूळ स्वभावगुणांची नव्याने ओळख होते. खेद हा प्रकार हा नेहमी उपलब्धी, काय मिळवायचे राहिले, अधिक पैसे, चांगली नोकरी, आणि अजून घरे (आजच्या भाषेत रिअल इस्टेट) इत्यादी दृष्टिकोनातूनच बहुतांश प्रकट होतो. येथे पु.ल. यांनी वैयक्तिक दृष्ट्या त्यांच्याकडून काय द्यायचे राहिले याचा खेद व्यक्त केला आहे. गाणी शिकवून, मुलांकडून गाववून, संगीताचा आनंद पसरवून त्यांना लहान मुलांना आनंदित करता आले असते. ते राहिले. 

कॉलेज मध्ये असल्यापासून मला चित्रपट बघण्याचा नाद जडला. बहुतेक मी इंग्रजी चित्रपट तेंव्हा बघत असे पण एकूण चांगला चित्रपट बघायला मला फार आवडते. पु.ल. च्या भाषेत मी एक फुकटाचा रसिक आहे असे म्हणता येईल. पु.ल. नी या विषावर "निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार" हा फार मार्मिक निबंध लिहिला आहे. 

"चित्रपट हे एक भावना आणि त्यामुळं आचारविचार, जीवनाविषयक दृष्टिकोन ह्यावर जबरदस्त आघात करू शकणार विलक्षण प्रभावी असं साधन आहे. ती एक शक्ती आहे. आणि या शक्तीचा वापर केवळ स्वार्थी हेतूनं केला तर एक सामाजिक घटक म्हणून आपण केवढं पाप करत आहोत याची जाणीव जर नसेल तर काय भयानक परिणाम होतात याची उदाहरण नव्यानं सांगायला हवीत असं नाहीं."   

हा निबंध कुठल्या साली छापल्या गेला आहे याची माहिती पुस्तकात दिलेली नाही पण तो आजच्या काळातही तंतोतंत लागू होतो. या निबंधावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. किंव्हा हा निबंध जश्याच्या-तसा लिहून सगळीकडे पुन्हा प्रकाशित करायला हवा. पु. ल. परखड आहेत पण ते तळमळीने लिहीत आहे. पु. ल. स्वतः कलाकार आणि अभिनेता होतेच पण ते मराठी चित्रपट सृष्टीचे सभासद हि होते. पण कधी त्या क्षेत्रातून रोजी-रोटी कमावली असली तरी त्यांचा प्रामाणिकपणा नेहमी सत्यासाठी होतं. आणि चित्रपट क्षेत्राचे समाजावरील परिणामाची परिस्थिती तेंव्हा, आणि आजहि दारुण आहे. अंग दाखविले कि लोक येणार याच भ्रमात हिंदी चित्रपट सृष्टी आज काल वावरते. काहीही करून लोकांनी तिकिटे विकत घेतली म्हणजे झाले मग त्यासाठी कलेचीच आहुती दिली तरी चालेल. 

"जीवनाकडे सदैव गंभीर दृष्टीनं पाहायला हवं, असं मुळीच नाहीं. अत्यंत आनंदाने पाहावं, हसावं, खेळावं, नाचावं, गाव. परंतु हे करण्यात जीवन अधिक समृद्ध करण हा हेतू असावा. रस्त्यात केळीची साल फेकून कुणाचा तरी पाय घसरून तो आदळला तरीही आनंदानं खिदळणारी मंडळी असतात. त्या आनंदात सुबुद्ध माणूस सहभागी होऊ शकत नाहीं. आपल्याला त्या मंडळींचा राग येतो. तीच गत चित्रपटाची आहे. प्रेमाला विरोध नाहीं; त्यातून वखवख दिसू नये. नृत्यात आनंद आहे; परंतु त्यातून गतीच्या विविधतेचा साक्षात्कार व्हावा, देहाचं प्राणिभाव जागवणारी दर्शन नसावं एवढच"   

चित्रपट निर्मिती हे काही सामाज-सुधारणेचे काम नाहीं हे पण पु. ल. मान्य करितात. पैसे कमवावा लागणारच आणि कमवायलाही हवाच पण याचा अर्थ चित्रपट किंव्हा निर्माता, दिग्दर्शकाने समाजातील स्वतःचे स्थान, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांची समाजासाठीची कर्तव्ये विसरून चालणार नाहीं. कारण याचे दुष्परिणाम त्यांच्या स्वतःच्या घरी पण जाणवतील. पु. ल. लेखात पुढे टीकाकारांना हि धारेवर घेतात. मला वाटत कि त्यांच्या टीकाकारांकडून काही अपेक्षा होत्या. आजच्या काळात ते असते तर त्यांनी बहुधा लेखातील हा भाग खोडून काढला असता. कारण आता टीकाकार फार कमी उरले आहेत. जे आहेत त्यांना प्रसिद्धी नाहीं आणि ज्यांना प्रसिद्धी आहे ते टीकाकार नाहीं, ते राजाच्या दरबारातील भाट आहेत. 

"चोखंदळपण कलावंतांची निवड करणाऱ्या निर्मात्यांनी, कलेचं दैवी देणं लाभलेल्या कलाकारांनी, लेखकांनी, गायकांनी, नटांनी आणि नटींनी आणि व्यासंगी टीकारानी हा आत्म्याचा सौदा करून समाजाला सैतानाच्या राज्यात नेऊन सोडायचा कि काय याचा विचार करायचा आहे" 

पुस्तकातील अजून एक लेख मला आवडला म्हणजे  "श्रीयुत दैववादी"

"देवावर विश्वास आहे असं म्हणताना कुठं तरी आपला जितका विश्वास असायला हवा तितका आहे कि नाहीं, याची खात्री नसल्यामुळं कि काय कोण जाणे, पण माणसं देवाच्या जोडीला हक्काचा दैवही घेतात"

आपला समाज शतकांपासून देव आणि दैवत तळ्यात-मळ्यात खेळतो आहे. पु.ल. यांनी देवावर विश्वास ठेवायला नकार दिला नाहीं पण दैवाचे वाभाडे काढले आहेत. दैवावर विश्वास ठेऊन हातावर हात ठेऊन समाज बसला असता तर गेल्या शंभर दोनशे वर्षातील इतकी प्रगती झालीच नसती असे पु.ल. म्हणतात. पण असे सांगतांना पु. ल. पुढे म्हणतात  "माणसाच्या हातात सार काही नाहीं हे तर खरंच आहे; पण माणसाच्या हातात काहीच नाहीं हे काही खरं नाहीं"  थोडक्यात दैव वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीस सामना करून पुढे पुढे मार्ग काढीत जाणे हेच उचित आहे. "ह्या लोकांनी देवासमोर कायमच भिक्षापात्र धरलेलं आहे. दोन्ही हात भिक्षापात्र धरण्यात गुंतलेल्या माणसं कर्तृत्वासाठी तिसरा हात कुठला आणायचा? हा केवळ दुबळेपणा झाला." यावर प्रतिवाद नाहीं.     

मनाला आधार म्हणून बहुतांश जन देवावर विश्वास ठेवतात. आणि जीवनातील अगम्य प्रकार बघून स्तंभित होऊन माणूस अखेर दैवाचे पाय धरतो असे मला वाटते. पण कधी कधी असेही वाटते कि असुदे बापुड्यांना दैववादी. सगळेच हुशार, इंजिनीअर, वैज्ञानिक नसतात. सामान्य आणि अती-सामान्य या कक्षेत बहुतांश जन जीवन कंठितात. या लोकांनी दैववादी होऊन समाजाचे तेवढे नुकसान होत नाहीं. आणि त्यांचा आयुष्य सुसह्य होतो. पण हा असला विचार थोडा निराशावादी आहे यात वाद नाहीं.  

हे पुस्तक म्हणजे पु. ल यांच्या लेख आणि भाषण संकलनाचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मला बहुधा लौकरच वाचायला मिळेल. पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हंटले तसे कि त्यांचे काही विषयांवरचे विचार आणि लेखन आजच्या परिस्थितीला चपखल बसते. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व, वाचकांशी संवाद सांधण्याची कला हि सर्वज्ञात आहेच. त्यांचा प्रज्ञावाद, विचारांची निर्भीडता, कुठल्याही युक्तिवादाशी असलेला अ-पक्षपात, समाजाचा बद्दलची तळमळ आणि जिव्हाळा पण तरीही सत्याच्या सतत शोध प्रकर्षाने जाणवतो. 

या लेखांमधून  पु ल. यांचे जेवढे महात्म्य आहे तेवढेच आपल्या सद्य समाजाची कमतरता आहे. शिक्षण वाढले कि अंधश्रद्धा कमी होतील, जात-जातींवरून कलह, वैषम्य दूर होईल, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण देणे आणि घेणे सोपे होईल, समाजाचे सामंजस्य वाढेल इत्यादी कल्पना भ्रामक आहे हे प्रकर्षाने जाणवते. दंभ आणि दांभिकता दोन्ही झपाट्याने वाढते आहे, जणू ते भाऊ-भाऊच! श्रद्धेत अगतिकता आणि पूजेत अनिर्बंधता वाढते आहे. समृद्धी वाढते आहे पण त्यासोबत मानसिक अबलताहि वाढते आहे. अबलतेची नेमकी कारणे कळत नाहीत म्हणून दोषींच्या शोधात सगळे जणू असतात. सगळ्यांना हक्क हवेत पण जवाबदाऱ्या मुळीच नकोत. स्वातंत्र्योत्तर समाजाचे वय वाढते आहे पण हवी तितकी परिपक्वता दिसून येतं नाहीं या. समाज शिक्षित होतोय पण सुशिक्षित होत नाहींया. यात काही कमी असेल तर भविष्यात येणाऱ्या आर्टीफिशियल इंटेलिजन्स (A . I .) च्या जमान्यात तर खऱ्या-खोट्यातील सीमारेषा इतक्या अस्पष्ट आणि संदिग्ध होणार आहेत कि अगदी भले भले हि भाम्बावातील. सुशिक्षित होण्यासाठी शाळा-कॉलेजेस लागत नाहीं. त्यासाठी अक्षर ओळख लागत नाहीं. त्यासाठी मनाचे चक्षु उघडावे लागतात आणि तेंव्हाच सत-असत, चांगले-वाईट, श्रद्धा-अंधश्रद्धा, उचित-अनुचित, खरेपणा-बेरकेपणा यातील भेद कळेल. नाहीं तर पु. ल यांचे हे लेख अजून शंभर वर्षांनीही लागू होतच असतील. 

असो. 

पु.ल. हा लेख वाचून म्हणतील कि माझ्या लेखनाचे परीक्षण करतांना आपलेच शब्द वाचकांवर लादणे छान चाललंय! 

या पुस्तकाची प्रत मिळाली तर अवश्य वाचा हे विनंती.