गेल्या शंभर -दीडशे वर्षात साहित्यिक क्षेत्रात "sci - fi " (साय-फाय) किंव्हा वैज्ञानिक लेखनाचा एक नवीन प्रवाह उदयास आला. त्या कालावधीत वैज्ञानिक प्रगतीचा तीव्र वेग बघता, या क्षेत्राशी निगडित लिहिल्या जाणे साहजिकच आहे. चित्त-चक्षु चमत्कार किंव्हा जादुई जगाची कल्पना करणे आणि वैज्ञानिक लिहिणे यातील महत्वाचे अंतर म्हणजे वैज्ञानिक लेखन हे साधारणतः विज्ञाननिष्ठ असते. आणि प्रतिभेच्या भराऱ्या भविष्यात प्रगत होणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चौकडीत बांधल्या असतात. मुख्यत्वे भौतिकशास्त्राच्या रिंगणात बहुतांश कथा कल्पिल्या जातात. म्हणूनच आंतररिक्षीय प्रवास, टाइम ट्रॅव्हल इत्यादी फार प्रसिद्ध कथानक आहेत.
समान्था हार्वे ( Samantha Harvey ) यांनी लिहिलेले 'ऑर्बिटल' ( Orbital ) या पुस्तकाला एक विशिष्ट श्रेणी द्यावी लागेल. पुस्तकाची कथा वैज्ञानिक नक्कीच आहे पण हे कथानक काल्पनिक आणि वैज्ञानिक आहे. कथा भविष्यातली नाहीं आणि भविष्यातील तंत्रज्ञान किंव्हा भौतिकशास्त्राच्या परिसीमेवरची सुद्धा नाहीं. सहा अंतरिक्षवीर पृथ्वीच्या घिरट्या घालीत आहेत. एका वैज्ञानिक प्रकल्पासाठी आणि पुढे चंद्रावरोहणासाठी विविध देशातील हे अंतरिक्षवीर अंतराळात पृथ्वीला घिरट्या मारणाऱ्या मानव निर्मित अंतरिक्ष स्थानकावर वास्तव्य करीत असतात. यात जपान, अमेरिका, रशिया, इंग्लंड, इटली चे अंतराळवीर असतात आणि चार पुरुष आणि दोन स्त्रिया असतात. हे पुस्तक एका चोवीस तासाच्या कालक्रमातील आहे. या चोवीस तासात हे अंतरिक्षस्थानक, जे खरे तर स्थानक नाहीं कारण हे एकाच स्थानावर स्थित नाहीं, पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेत १६ वेळा चकरा मारते. म्हणजे दार ९० मिनिटात पृथ्वीची एक चक्कर पूर्ण होते हि कक्षा म्हणजे दक्षिणेकडून-उत्तरेकडे आणि मग पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला उत्तरेकडून-दक्षिणेकडे अशी दिशा आहे. पुस्तकात एकूण १६ भाग आहेत. थोडक्यात, एका अंतराळयानाचा दिवस आणि त्यात पृथ्वीवरचे घडत असलेले 'अनेक' दिवस आणि त्या 'अनेक' दिवसात दिसणाऱ्या पृथ्वीच्या विविध छटा. आणि त्या छटांचे या सहा अंतराळवीरांच्या मनात पडणारे प्रतिबिंब हे पुस्तकाची मूळ कल्पना आहे.
" They feel space trying to rid them of the notion of the days. It says: what's a day? They insist it's twenty -four hours and ground crews keep telling them so, but it takes their twenty-four hours and throws sixteen days and nights at them in return." (पृष्ठ १३)
पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीचे सूक्ष्मपणे केलेले वर्णन. हे लिहिण्यासाठी लेखिकेने अमेरिकेची अंतरिक्ष संघटना NASA (नासा) यांची मदत घेतली होती. तिने कॅमेरातून स्वतः हे दर्शन घेतले आणि निरीक्षण केले आणि मग अत्यंत बारकाईने ते पुस्तकात टिपले. वाचणाऱ्याला आपणच जणू अंतरिक्ष यानात आहे अशी भावना येते. खाली एक परिच्छेद थोडा लांब असला तरी मुद्दाम प्रस्तुत करतोय कारण त्यानेच लेखिकेच्या कष्टाची कल्पना येते.
The hundred-cymbal clang of sudden daylight. A few minutes later they come in off the ocean where the Maldives, Sri Lanka, the tip of India are ripe with morning. The shallow shoals and sandbanks of the Gulf of Mannar. Off to starboard are the shores of Malaysia and Indonesia where the sand algae, coral and phytoplankton make the water luminous with a spectrum of greens - except now there's tumbled broken-up storm cloud and the usually tranquil view is weary and troubled. As they ascend India's east coast the clouds are thinning; morning strengthens, is briefly stark, and then a haze moves in at the Bay of Bengal, the clouds wispy and numerous add the Ganges silt estuary opens into Bangladesh. The umber plains and ochre rivers, burgundy valley of a thousand-mile ridge. The Himalayas are creeping hoar frost; Everest as indiscernible blip. Everything beyond them, which caps the earth, is the rich fresh brown of the Tibetan Plateau, glacial river-run and studded with sapphire frozen lakes." (पृष्ठ १२३)
येथे लेखिकेच्या भाषेवरचे प्रभुत्व झगमगते. पृथ्वीचा प्रत्येक भूभाग विशिष्ट शब्दाने तिने रंगविला आहे. "Ochre" हा शब्द जास्त लोहयुक्त मातीचा रंग दर्शवितो. बांगलादेश मधील गंगा किंव्हा बिहारच्या छोटा नागपूर भागातील गंगेची माती लोहयुक्त असते त्यामुळे त्या मातीचा रंग अवकाशातून गंजलेल्या लोखंडासारखा दिसत असणार. हिमालयाची विशालता दर्शविताना लेखिका "Indiscernible " हा शब्द वापरते. मराठीत या शब्दाचा अर्थ अस्पष्ट असा होतो. अर्थात, हिमालय अस्पष्ट कसे? तर त्याची विशालता एवढी आहे कि कुठे सुरु होतायत आणि कुठे संपतायत आणि लांबी-रुंदी नेमकी केवढी याचा आराखडा बंधानेच अशक्य असल्यामुळे इतके अनंत कि जणू अस्पष्ट असा विचार लेखिकेला मांडायचा असावा. पुढे हिमालय ओलांडून तिब्बत चे पठार आहे. लेखिका याला " which caps the earth " असे म्हणते. लेखिका पठाराला " Cap of the earth " असे म्हणत नाहीं. तिब्बत चे पठार इतक्या उंचीवर इतका सपाट भूभाग म्हणजे पृथ्वीची जणू टोपी आणि या कल्पनेला वेगळ्या दृष्टीने मांडतांना तिब्बत ' Caps the earth " असा करून एक वेगळा सूक्ष्म भाव समोर ठेविते. तब्बल ३००-४०० किमी अवकाशातून पृथ्वीवर मनुष्य अदृश्य होतो पण भूभाग जिवंत होतो. हा जिवंतपणा लेखिकेने नाविन्यपूर्ण शब्द संचालनाने अचूक टिपले आहे.
आता वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर अंतराळात ना उत्तर ना दक्षिण आणि ना पूर्व ना पश्चिम. या दिशा आणि दिशांवरून बांधलेला दिवस-रात्र, आणि त्यानुसार आखलेली वेळ आणि कालगणना आणि त्या अनुषंगाने आखलेला आपला जीवनक्रम. पृथ्वीवरच आपण नसू तर हे धागे-दोरेच नाहीसे होतील. पण मग उरेल काय? अचानक मानवी आयुष्याची नगण्यता, क्षुल्लूकता प्रकर्षाने जाणविते. नाती-गोती, देव-धर्म, देश सगळे मातीचे मनोरे सगळे. पण आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा आधार घेतला तर वेळ किंव्हा काळ हीच कल्पना मुळात मानवी मनाची संकल्पना आहे. आणि त्यानुसार आखलेले जग सुद्धा आपण मनाच्या संकल्पनेचेच प्रतिबिंब आहे. आणि तेच आपण सगळीकडे घेऊन हिंडतो. त्यामुळे पुस्तकातील आपले अंतराळवीर सूर्य-पृथ्वीच्या लपंडावामुळे निर्माण झालेल्या दिवस-रात्रीच्या खेळापासून दूर गेले असले तरी त्यांच्या मनातील त्यांचे जग तसेच कायम आहे.
जपानची अंतराळवीर 'ची' (" Chie ") ची आई ती अवकाशात असतांना वापरते. मातृवियोगाचे दुःख, आईसोबतच्या आठवणी, तिला कधीही पुन्हा न भेटू शकण्याची खंत आणि तिच्या अंतिम संस्कारास नसण्याचा खेद या भावनांशी झगडतांनाही ती आपली कर्तव्ये निगुतीने पार पाडीत असते. रशियाचा रोमन ("Roman ") त्या अंतराळस्थानावर तब्बल ४३४ दिवस असतो. अमेरिकेचा शॉन (" Shaun ") याचा देवावर विश्वास असतो. विज्ञानाच्या परिसीमेवर आणि विज्ञानाच्या सर्वोच्च उपलब्धीचे स्वरूप असलेले हे अंतरिक्षस्थान आणि अंतराळयान सामोरे असतांना एका अज्ञात आणि अनकालनीय 'देव' या संकल्पनेवर शॉन कसा विश्वास ठेऊ शकतो हे इंग्लंड च्या नेल (" Nell ") ला मुळीच कळत नसते. रशियाचा अँटोन (" Anton ") चा पृथ्वीवरचा संसार तेवढा सुखाचा नसतो. आणि त्याची बायको आजारी पण असते.
अवकाशात फिरत असलीत तरी त्यांची नाळ अजूनही पृथ्वीलाच बांधलेली आहे. त्यांच्या अडचणी, त्यांच्या आशा आणि आकांशा, त्यांच्या मनातील भीती या सगळ्या आपल्या सामान्यांसारख्याच आहेत. कुटुंबियांचे विचार, आठवणी, आई-वडिलांच्या आठवणी, लहानपणीच्या आठवणी, भविष्याची भीती किंव्हा बघितलेली स्वप्ने या सगळ्यांची घोंगडी करून, त्यात आपले अंतराळवीर स्वतःला गुरफटून घेत असतात. जणू फुलपाखरू होण्याची स्वप्ने बघत असलेला सुरवंट.
इंग्रजी भाषेत वैज्ञानिक काल्पनिक (किंव्हा काल्पनिक-वैज्ञानिक) पुस्तके आणि लेखक अनेक आहे. भाषा या क्षेत्रात समृद्ध आहे. साहजिकच आहे कारण गेल्या दोनशे वर्षात वैज्ञानिक प्रगती सगळ्यात जास्त याच भाषेत झाली. मेरी शेली (Mary Shelley ) यांचे फ्रँकीस्टाईन ( " Frankenstein ") हे इंग्रजीतील पहिली काल्पनिक वैज्ञानिक कादंबरी मानल्या जाते. या पुस्तकाचा मराठीतही अनुवाद झालाय आणि वाचल्या गेला आहे. पुढे जुल्स वन (" Jules Verne ") हे फ्रेंच कादंबरीकार फार प्रसिद्ध झालेत. इंग्रजीत हर्बर्ट वेल्स (H G Wells ) किंव्हा आर्थर सी. क्लार्क (" Arthur C Clark ") यांनी अनेक अति-प्रसिद्ध पुस्तके लिहिलीत. अमेरिकेचे आयसक असिमोव ( Issac Asimov ) यांनी शेकडो पुस्तके आणि गोष्टी लिहिल्यात. त्यांची रोबोट आणि फौंडेशन सिरीज अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यावर सिनेमे सुद्धा बनले आहेत. मी असिमोव खूप वाचला आहे. विज्ञान, मानवी जीवनाच्या संकल्पना आणि कल्पनाशक्तीची परिसीमा याच्या संगमावर असिमोव यांनी लिहिले आहे. रोमांचक आणि कल्पक अश्या त्यांच्या कथा मानवी वस्तुस्थितीपासून दूर नसतात. हाच एक गमतीदार भाग आहे. कितीही वैज्ञानिक प्रगती झाली किंव्हा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीबद्दल आज कितीही कल्पना रेखाटल्यात तरी मानवी जीवनाला केंद्रबिंदू ठेवल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आधी म्हंटले तसे, कल्पनेच्या भराऱ्या असो कि भौतिक दृष्ट्या पडताळून बघू शकतो असे विज्ञान असो हा सगळा मनाचा किंव्हा कर्त्याचा खेळ आहे. आणि या पुस्तकाचे आणि लेखिकेच्या यशाचे गुपित नेमके हेच आहे.
मागल्या वर्षी अंतराळयान आणि अंतराळवीर या क्षेत्रात भारताच्या दृष्टीने दोन महत्वपूर्ण घटना घडल्यात. एक तर भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स अंतराळयानात तब्बल ९ महिन्या अडकल्या होत्या. तांत्रिक बिगाडामुळे त्यांचा परतीचा प्रवास विस्कळीत झाला आणि मग त्यांना परत घेऊन यायला नवीन अंतराळयानसुद्धा नीट मिळेना. दुसरा म्हणजे, श्री राकेश शर्मा नंतर भारताचे श्री शुभांषु शुक्ला यांना अमेरिकेन अंतराळयानातून अवकाशात जायला मिळाले. हे पुस्तक वाचल्यावर सुनीता विलियम्स आणि श्री शुक्ला यांना काय दिसले असेल आणि त्यांचे अनुभव कसे असतील याची प्रचिती येते. रसग्रहण या शब्दाचा वापर आपण साधारण कलेचा आस्वाद घेण्याबद्दल वापरतो. पण या पुस्तकाद्वारे विज्ञानाचे आणि अंतराळाचे रसग्रहण करता येते असे म्हणायला हरकत नाहीं.
या पुस्तकाला सन २०२४ चा इंग्रजी भाषेतील सर्वोच्च असा बुकर (" Booker " ) पारितोषिक मिळाले आहे. पुस्तक पारितोषिकास पात्र नक्कीच आहे. ज्या वाचकांना या विषयात आस्वाद असेल त्यांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे.