1/30/14

बस ड्रायवरचा प्रजासत्ताक दिवस

माझे मामा-मामी भंडार्‍याला असतात. नागपूर हून कलकत्त्याच्या दिशेने सरळ रेषेत प्रवास केला की बरोब्बर ६४ कि.मी वर वैनगंगेच्या किनारी भंडारा लागत. काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन गोंदिया जिल्हा नव्याने निर्माण झाला. उर्वरीत भंडारा जिल्ह्याचे केंद्रस्थान भंडारा गाव आहे. मामा-मामी कडे उन्हाळ्यात किंवा इतर वेळी (नागपूर ला सदैव उन्हाळाच असतो!) जायचे तर एस्.टी. च्या बसेस अति-उत्तम वाहन होते. दर अर्ध्या तासाने भंडार्‍याच्या दिशेने बसेस सुटतात. दीड तासात भंडारा. त्यातल्या काही बसेस चा मार्ग थोडा वेगळा असे. नागपूर जिल्ह्यातला मौदा तालुका केंद्र रस्त्यात लागत असे. काही बसेस मौद्याच्या बस्-स्टँड वर थांबत असत. '

किस्सा थोडा जुना आहे.

एकदा नागपूरला परततांना माझी बस थोडक्यात चुकली पण मौदा मार्गे जाणारी बस निघतच होती. मी धावत्या बस मधेच चढलो.

"मौदा मार्गे जाते भाऊ" ड्रायवर म्हणाला.
पुढल्या बसची वाट बघत बसण्यापेक्षा उशीर झाला तरी चालत्या बस मधे बसलेल परवडत.
"हो, चला, आज मौदा दर्शन घेउ" मी उत्तरलो.
"मौदा म्हणजे नागपूर-भंडार्‍याच्या मधल लंडन " तो हसत उत्तरला.
मला काही त्याचा विनोद कळला नाही. बस फारशी भरली नव्हती. मी ड्रायवरच्या बाजुच्या सीटवरच बसलो. रस्ता छान दिसतो आणि स्वतःची स्वतंत्र सीट मिळते
"नागपूरचे की भंडार्‍आचे?"
"नागपूर"
माझ टिकिट कंडक्टर ला दाखविणे कार्यक्रम झाला. बस भंडार्‍याच्या बाहेर एव्हाना पडली होती.
"मौद्याला थांबण जरूरी आहे का हो"
"मौदा मार्गे जाते मगाशीच तर म्हणल होत भाऊ"
"हो, ते ठिक आहे पण मौद्याला कोण उतरणार, चढणार? "
"मौद्या अर्धी बस उतरन आणि अर्धी चढन"
"बर"
"जास्त वेळ नाही लागत. हे इकडन लोक उतरले कि ते तिकडन लोक चढतात. मग सनान घेतो गाडी"
"आरामात चालवा भाऊ, एवढासा रस्ता आहे. मला काही घाई नाही"
" अस नाही भाऊ, पंधरा वर्ष झाली गाडी चालवुन, एकन-एक खडडा माहिती आहे"
"किती वेळात तुम्ही नागपूरला पोचवु शकता?"
"चाळीस मिनिट"
"मौद्याहुन?"
"नाही जी, भंडार्‍याहुन"
"शक्यच नाही
"हो जी, कारगीलच्या वेळेस पोचवली होती गाडी चाळीस मिनिटात"
"अहो, कारगील कश्मीरला आहे"
तो जोरात हसला.
"आपल्या गाडीची वेळ होती २ ची आणि आपला एक सैनिक भाऊ पाउणे-दोन ला हाजिर झाला गाडीवर. त्याची ३ची नागपूरहुन ट्रेन होती दिल्लीला. त्याला वाटल की कशीतरी मिळु शकते ट्रेन. पण आपली बस मौदा मार्गे जाणारी होती. ते कळल्यावर त्याचा जीव घायबरला. तो बस मधुन उतरून टॅक्सी मिळते का बघायला लागला. मी तसाच खाली उतरलो, त्याला बस मधे घातल आणि म्हणल की टेंशन नको. मी पोचवतो तुम्हाला. बसंती सारखी बस हाकली नागपूरच्या दिशेनी"
"मग" हे सगळ सांगतांना तो गाडी चालवतच होता. खड्डे चुकवत
" मौदा नाही आणि फौदा नाही. सनान गाडी नागपूरला. चाळीस मिनिटात नागपूर बस स्टँड. तिथुन अडीचला त्याला ऑटोत बसवल. मिळाली असणार पठ्ठ्याला गाडी"
"बसमधले मौदावाले लोक?"
"कोणी कायीच बोलल नाही. सगळे पुन्हा मौदा मार्गे भंडार्‍याच्या बस मधे बसुन परतलेत. मी तिथल्या स्टेशन सुप्रीटेंडन ना हे सांगितल तर त्या सगळ्या प्रवाशांना फ्री टिकीट मिळाल मौद्याला परतायच."
कारगिल युध्दाला तेंव्हा तीन वर्ष होउन गेली होती पण त्या ड्रायवरच्या चेहर्‍यावर समाधान लखलखत होत.
"भाऊ, कारगिल मधे गोळ्यांची बरसात होत होती. आपले कित्ती तरी जवान मेलेत. पण आपला सैनिक भाऊचा जीव त्या गोळ्यांच्या बरसतातीत भिजायला उत्सुक होता. याला म्हणायच शेर-दिल."

मी पुढे काही बोललो नाही. प्रसंग डोळ्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करत होतो. घाईत असलेला सैनिक, भरधाव जाणारी एस्.टी. ची गाडी, मौद्याला जाणारी पण प्रसंगी चुप-चाप नागपूर पर्यंत प्रवास करणारे प्रवाशी. अगदी सिनेमातल्या सारख होत. पण मला काही ते दृश्य डोळ्या समोर उभ करता येइना. ना मी सैनिक होतो, ना मला बस चालवता येते आणि ना ही मी मौद्याला रहातो.

नागपूर आल. मी बस स्टँड वरुन घराच्या दिशेने चालू लागलो. ड्रायवरचा शेवटल वाक्य माझ्या मनात कुठेतरी घर करुन बसल. तो सैनिक युध्दानंतर परतला का हेसुध्दा विचारयच भान राहिल नाही. एखाद वेळेस त्या ड्रायवरलाही माहिती नसेल.

दर प्रजासत्तक दिनाला किंवा स्वातंत्र्य दिनाला मला ही गोष्ट आठवते. या प्रसंगाला इतकी वर्ष झालीत की ड्रायवरने सांगितलेल्या या किस्स्यात खर किती आणि मन-घडन किती, याचीही शंका येते. तस म्हणल तर या प्रसंगात काहीच विशेष नाही पण थोड सखोल निरिक्षण केल तर आपल्या समाजाचे अनेक रंग झळाळातात. तो सैनिक, तो ड्रायवर, ते प्रवाशी आणि फुकटात परतीची टिकीट देणार सुप्रीटेंडट, हे सगळे समाजाच्या विविध स्तरातील आणि आयुष्यात वेगवेगळा प्रवास करणारे घटक आहेत. पण आपल्यामुळे एका सैनिकाची ट्रेन सुटायला नको किंवा त्याला ट्रेनवर वेळेवेळेवर पोचायालच हव या साठी सगळे आपापल्या परीने झटलेत. कळत-नकळत प्रत्येकाने आपले खारीचे योगदान दिले. असे असंख्य किस्से, घटना आणि प्रसंग आपल्या देशात सतत घडत असणार. फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते. असे प्रंसग घडतात म्हणुनच गेल्या सात दशकात आपल्या देशाने एवढी प्रगती केली. करोडो लोकांना गरिबीतून वर काढले आणि सुशिक्षित केल. अन्न धान्याच पर्वतकाय उत्पादन करण्याची क्षमता निर्माण केली. देशाच्या रक्षणार्थ नौदल, वायुदल आणि भूदलाचे अभेद्य कवच तयार केल. आकाशात उपग्रह पाठवलेत आणि नुकतच मंगळावर यान पाठवले.

अजुन अनेक गोष्टी साध्य होणे आहे आणि त्यासाठी भरपूर कष्ट उपसावे लागणार आहेत पण ड्रायवरचा हा किस्सा आठवला की अशक्यातल शक्य होणार याची खात्री पटते.

खड्डे चुकवित गाडी सनान जाणार याची खात्री वाटते. 

1 comment:

Anonymous said...

सुंदर लिखाण. अगदी मन भरुन आले. सदैव भारतातील भ्रष्टाचार, गरिबी आणि अंदाधुंदी यावरच लिहीणार्‍या आणि बोलणार्‍या लेखांच्या मांदियाळीत पावसाचा हलका शिडकावा पडल्या सारखा सुखद, दिलासादायी आणि पॉझिटिव्ह लेख. ’गाडी सनान जाणार’....विश्वास वाढला...!

रिगार्ड्स
अश्विनी