9/21/11

मनोहर




खोलीत वातावरण तंग होत. कोपर्‍यात एक बाई रडत उभी होती. फार घाबरलेली. भिंतीशी एक मध्यम वयीन माणुस थरथरत भिंतीला तोंड करुन  उभा होता. त्याच्या डोक्याला बंदुक लाऊन एक पोलिसच्या वेषातला व्यक्ती उभा होता.
"हजार रुपये प्रत्येक इंचाला" खुर्चीवर बसलेल्या दुसरा व्यक्ती बोलला. तोही पोलिसच्या वेषातच होता.
"याच्या कानशीलाच्या पाच इंचाच्या आत गोळी मारली तर हजार रुपये. चार इंचाच्या आत मारली तर दोन हजार" तो पुढे म्हणाला.
"साल्या कटिंग चहा पाजतोयस का?"
खुर्चीवरचा माणूस भेसूर खिदळायला लागला. "कटिंग चहा!"
"अहो वहिनी चहा करता का थोडा?" बंदुक वाला माणुस बोलला. "पाहुण्यांना चहा-पाणी विचारायची रीत नाही वाटत या घरात"
भिंतींला टेकलेल्या माणसाला घामाची आंघोळ झाली होती.
"तुम्ही पोलिस आहात की हैवान?" त्याच्या तोंडुन शब्द अडखळत बाहेर पडले.
ती दोघे जण अजुनच खिदळायला लागलीत.
"हैवान? कोण वापरत हा शब्द आजकाल?" बंदुक वाला किचकट हसत म्हणाला.
"मराठी मिडमचा दिसतोय" खुर्ची बोलली.
"आणि साल्या तू मोठा कॉन्वेंट ला गेलायस?" बंदुकवाला खेकसला.
"ए इकडे तोंड कर" अस म्हणत बंदुक वाल्यानी त्या भिंतींला टेकलेल्याला टपली मारली.
"शिंग दिसतायत का आमच्या डोक्यावर?"
खुर्चीवाला ते ऐकुन परत खिदळायला लागला. "शिंग" अस म्हणत त्याच हसण वाढतच गेल.
बंदुक वाल्याने फाडकन गोळी मारली.
खोलीत शांततेचा आणि बारुदीचा संमिश्र वास शिगोशिग भरला. कोपर्‍यातल्या बाई डोळे मोठ्ठे करुन  खालती बसल्या.
"काढ दोन हजार रुपये. चार इंचाच्या आत आहे बघ"
भिंतींला टेकलेल्या माणसाची स्थिती बघवत नव्हती. तो तत्-पप् करायला लागला होता.
"हैवान असतो तर तुझा खोपडा उडालेला असता"
मग बंदुक त्या माणसाच्या तोंडात खुपसुन त्या बंदुक वाल्याने विचारल "मनोहर कुठेय?"
"तत्-पप् काय करतोस? बोल, बोल ना... मातीच तोंड दिलय का देवानी?"
"अरे ए दोन हजार काढुन ठेव"
"साहेब आता दुरुन नेम धरा. याच्या दुप्पट लावतो"
"का रे साल्या खुप चरायाला मिळतय सध्या तुला"
"तुमची कृपा साहेब"
तो बंदुकवाला हळु-हळु मागे सरायला लागला. त्याने बंदुक रोखलेलीच होती.
"मनोहर मला माहिती नाही"
"असा कसा माहिती नाही. वकिल साहेबांना मारा-पिट्या करायला बरा सापडतो"
"अरे सांगुन दे साहेबांना. अस उंदरासारख तुला छळायला आम्हालाही आवडत नाही."
"बघ तीन इंचाच्या आत मारतो इतक्या दुरुन. पोलिस अकादमीतुन फुकटात पास नाही झालो."

ठ्यँव!

वातावरण स्तब्ध झाल.

"साहेब काय केलत"

त्या साहेबालाही एव्हाना घाम फुटलेला होता.

रक्ताची सरळ रेख आखत त्या माणसाच धड भिंतीला चिकटुन खाली बसल.
तेवढ्यात दार उघडुन कोणीतरी आत आल.

हवालदाराने मोठ्ठा आवंढा गिळला.

"साहेब, मनोहर!"

(क्रमशः की समाप्त?)


No comments: