(हा लेख बऱ्यापैकी लांब आहे. पण आरामात का होईना पूर्ण वाचावा हि विनंती.)
गेल्या काही महिन्यात भुवनेश कोमकली - जयतीर्थ मेवुंदी, संदीप नारायण, तौफिक कुरेशी अशा कलाकारांचे कार्यक्रम ऐकता आले- आणि नवीन पिढी शास्त्रीय संगीताची परंपरा किती समर्थपणे पुढे नेते आहे हे स्पष्ट होते. एकूणच गेल्या वर्ष भरातच एकूण बरीच सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती देता आली.
या संगीत बैठकीत बसल्यावर मला माझ्यातील एक उणीव जाणवली ते म्हणजे मी श्रोता म्हणून कमी पडतो. मला गायकीचे आणि सुरांचे, रागांचे ज्ञान नाहीं. या गायकांच्या गाण्याचे माहात्म्य म्हणजे कि माझ्यासारख्याला (आणि माझ्या सारख्याच अजून असंख्य लोकांना) ते सुरांद्वारे वर नेतात पण त्यांना दाद देण्यासाठी मी तोकडा पडतो. आता पंडित भीमसेन जोशी यांची हि प्रस्तुती - पावसाळी ढग मनात आणतात. भाव आणि शब्द कमी पडतात. माझ्या संगीत प्रवासाबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. पुन्हा पुनरावृत्ती नको. पण थोडक्यात खूपदा शब्द अनावश्यक असतात. किंव्हा अनावश्यक हवेत. पण स्वतःला, उदाहरणार्थ, पंडीत भीमसेन जोशींनी आळवलेला राग मिया कि मल्हार समजायला कुठली तरी भाषा हवी, स्वतःच्या मनातले शब्द हवेत.
कवितांच्या कुशीत:
गाण्यांचा प्रभाव तर लगेच मनावर बिंबवतो पण कविता वाचल्यावर लगेच कळतातच असे नाहीं. कुठे तरी कवितेचे बीज मनात रुजते मग कधी कधी पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्याला अंकुर फुटतात किंव्हा जुन्या आठवणींच्या सिंचनाने त्याचा गर्भार्थ उमलतो किंव्हा कवितेच्या शब्दांनी जुन्या आठवणींचे कपाट नकळत उघडते.
कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळुन पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा…
('पैठणी', कवियत्री शांत शेळके)
खूपदा कविता समजायला वयाचे टप्पे गाठावे लागतात. अनुभवांचे चटक्यांनी मन अंतर्मुख होते. मग कवितेचे शब्द साधारण असले तरी मनाला भिडतात कारण त्यात साध्य शब्दातच स्वतःचे साधारणपण
भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही
('मी मोर्चा नेला नाही', श्री संदीप खरे)
लहानपणीची आठवण म्हणून मी खालील कवितेच्या ओळी दिल्यात तर वाचकाच्या मनात आल्हादायक झुळूकेला भास होईल.
दसऱ्याच्या आदल्या दिनी, जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत, साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू, शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन, फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
पण श्री नारायण सुर्वे यांच्या कविता ज्यांनी आधी वाचल्या आहेत त्यांना पोटात पुढे खड्डा पडणार याची जाणीव असते. आणि मग एकदम पोटात कोणी गुद्दा मारावा तसे पुढले कडवे येते.
एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे, तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू, जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो, माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पांचानी, एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून, घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर, जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.
('माझी आई', श्री नारायण सुर्वे)
किंव्हा विल्यम ब्लॅक नावाच्या इंग्लिश कवीची कविता दारिद्र्य आणि १९ व्या शतकातील इंग्लंड मधील औद्योगिकीकरणाची भीषणता थोडक्यात दर्शविते. तापलेले भांड माहिती नसतांना आपण उचलायला गेलो कि कसा चटका बसतो तसे या कवितेतील शब्द चटका देतात
When my mother died I was very young,
And my father sold me while yet my tongue
Could scarcely cry " 'weep! 'weep! 'weep! 'weep!"
So your chimneys I sweep & in soot I sleep. (1)
And by came an Angel who had a bright key,
And he opened the coffins & set them all free;
Then down a green plain, leaping, laughing they run,
And wash in a river and shine in the Sun. (3)
(The Chimney Sweeper , William Blake )
किंव्हा हिंदी चे सुप्रसिद्ध कवी श्री दृश्यांत कुमार यांच्या एका कवितेतील हि पंक्ती गरिबीने त्रस्त जीवनाच्या धामण्यात स्फूर्तीचे रक्त रगरगवते:
आपके कालीन देखेंगे किसी दिन
इस समय तो पाँव कीचड़ में सने हैं!
('बाढ़ की संभावनाएँ सामने हैं', दुष्यन्त कुमार)
पण कविता कळायला, त्याचा आनंद घ्यायला, शिकाव्या लागतात. शिकवणारे लागतात. माझे मराठी शाळेपासून चांगले होते. पण मी फारसा अभ्यास न करता मराठी पेपर चांगला सोडवीत असे म्हणून मला मराठी येत होते का? १०वी च्या वर्गात मी मराठी ची ट्युशन लावली. या मॅडम आमच्या शाळेच्या अत्यंत प्रसिद्ध मुख्याध्यापिका होत्या पण माझ्या वेळेपर्यंत त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या कडे मला मराठी समजले. अर्थ, भावार्थ, गर्भार्थ उमजला. सगळ्यात छोटा धडा का सर्वात कठीण आहे हे कळले. त्या एका वर्षाच्या ट्युशन चे पडसाद अजूनही माझ्या वाचनात आणि लेखनात (मला) ऐकू येतात आणि त्यांनी शिकविलेल्या पाऊलखुणांवर मी अजूनही शब्द गिरविण्याचा प्रयत्न करतो. हे माझे नशीब पण असेच भाग्य संगीतात किंव्हा कलेत लाभले नाहीं.
हनुमंताशी हितगुज:
कवितेसारखेच, कलेतील बारकावे समजायला अभ्यास हवा. पण मला मात्र तसा अनुभव MET मधला हनुमंत बघून आला नाहीं. अमेरिकेत न्यू यॉर्क शहरात मेट्रोपॉलिटिन म्युसीअम ऑफ आर्टस् ('MET ) नावाचे संग्रहालय आहे. जगभराच्या गोष्टी, चित्रे, मुर्त्या तिथे आहेत. (या बहुतांश चोरलेल्या आहेत. अर्थात असा आरोप सिद्ध होऊ शकत नाहीं कारण चोरांकडून त्यांनी विकत घेतल्यामुळे मुर्त्या फक्त ट्रान्सफर होतात, चोरीचा आरोप ट्रान्सफर होत नाहीं!) त्यात 'Conversing Hanuman ' नावाची सुरेख कास्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीबद्दल फारच अल्प माहिती आहे. हनुमान रामाशी बोलताना, एक हात नमस्कारात, दुसरा हात संवादाच्या मुद्रेत. ती पाहताना मनात भक्तीचा, निष्ठेचा, संवादाचा आनंद उमटतो. पण त्याचा इतिहास, चोल काळातील कलेची सूक्ष्मता, रामायणातील संदर्भ हे सगळं समजण्यासाठी वाचन, ऐकणे, अभ्यास लागतो. तो कुठून मिळणार? आणि कसा मिळणार? पण या अभ्यासाशिवाय समोर फक्त एक विलोभनीय मूर्ती उरते. हनुमान मिळत नाहीं.
कधीकधी अचानक नशीब फुलते. मूर्तीतील देव म्हणतो, 'चल तुला गम्मत दाखवितो' आणि मग इतिहास, कला व संस्कृतीच्या अलौकिक त्रिवेणी संगमात न्हायला मिळते. कुटुंबासोबत संभाजीनगराला जायची संधी मिळाली. अर्थात, कैलास देऊळ बघणे आलेच. आधी आम्ही चक्कर मारल्यासारखे फिरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरकारी अधिकृत गाईड समोर आलेत. मागे लागलेत कि मी तुम्हाला दाखवतो जे तुम्हाला दिसत नाहीं या ते. त्यांची फी होती. मी उगाच नको नको म्हणत होतो. ते म्हणाले (त्यांचे नाव आठवत नाहीं) कि 'साहेब, पैसे शेवटी द्या. नाहीं आवडला तर एक हि पैसे घेणार नाहीं. पण तुम्हाला नक्की आवडणार माझा टूर आणि तुम्ही स्वतःहून जास्त पैसे द्याल'. आणि अगदी तसेच झाले. सगळं परिसर जणू जिवंत झाला. सगळे शिल्प जागृत झालीत. शंकर-पार्वतीचे लग्नाचे शिल्प म्हणजे भास होतो आपणच तिथे उभे आहोत. कारण ते शिल्प 'फोटो' नव्हते. ते जिवंत होते. त्यात पार्वतीच्या पायातील एक दागिना कुठे तरी पडलेला असतो. आणि एक हात शंकराच्या हातात आणि दुसरा हात पार्वती तिच्या पायाकडे दाखवीत असते, तिचे एक पाऊल उचललेले आहे आणि तिच्या सखीला ती हाताने इशारा करतेय कि 'हा दागिना हरवलाय'. अजून एक शिल्प आहे कि शंकर-पार्वती द्यूत खेळतायत आणि शंकर त्यात हारतोय. तर शिल्पाच्या कोपऱ्यात पार्वतीची पोर नंदीची शेपटी ओढतायत, त्याला चिडवत कि बघ 'तुझा शंकर हारतोय'. अजून एक बारकावा म्हणजे, शंकर बसलेली गाडी जास्त दबलेली आहे तर पार्वतीची कमी दबलेली आहे. हे सगळं दगडात कोरलय! आम्हाला हे बारकावे कळले नसते, शिल्प उमजले नसते. वास्तुशिल्पाचा कौशल्याचा अंदाज आला नसता. शंकर-पार्वती भेटले नसते ना नंदीला चिडवणारी त्यांची पोर!
शेवटी नटराजाच्या चरणी:
फार वहावत गेलो. पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. आनंद घेता येणे म्हणजे कळणे नव्हे. कळल्या शिवाय आनंद घेताच येत नाहीं असे नाहीं पण जाणीव झाल्यावरचा जो आनंद आहे त्याला शब्द नाहीत. कारण स्वरांचा, शब्दांचा, रेखाटलेली किंव्हा शिल्पिलेली कला हृदयाचा ठाव घेणार अनुभव असतो. कलाकार किंव्हा शिल्पकार होणे जसे सोपे नसते, त्यामागे तपांची तपस्या असते तसे रसिक किंव्हा श्रोता होणे सोपे नाहीं. उपस्थिती देऊन वाह-वाह करणे श्रोता होणे नाहीं. सादर केलेली प्रस्तुती समजायला मेहेनत करायला हवी.
श्रद्धाभक्तिसमायुक्ता नान्यकार्येषु लालसा: ।
वाग्यता: शुचयश्चैव श्रोतार: पुण्यशालिन: ॥
(योग्य श्रोता तोच आहे, ज्याच्या जवळ श्रद्धा आणि भक्ती आहे. या श्रोत्यांचा हेतू फक्त ज्ञान प्राप्ती आहे. ज्यांचे आपल्या वाणीवर ताळा आहे. (उगाच वाह वाह नाहीं!) आणि ज्याचे मन शुद्ध आहे)
हे शिकणे कंटाळवाणं नाही — उलट, ते आनंदाचं नवं द्वार उघडतं. कारण कला — संगीत असो, कविता असो, मूर्ती असो — फक्त कलावंतांची नाही. ती आपल्या सर्वांची आहे. आणि तिचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर आपण चांगले श्रोते, चांगले वाचक, चांगले दर्शक व्हायला शिकलं पाहिजे.
वानर आणि नरांमध्ये मूळ भेद फक्त अंगठ्याचा नाहीं तर नरांमध्ये कला निर्माण करण्याची आणि ती कला उपभोगण्याची दैवी देणगी हा आहे. बहुतांश आपण या क्षेत्रात उपभोगी आहोत मग त्यातच उच्चतम पातळी गाठणे आपले कर्तव्य नाहीं का?