1/16/10

भ्रमाच्या शोधात

नुकतेच न्यु-यॉर्क टाईम्स मध्ये तीन लेख प्रकाशित झालेत. विज्ञाना विषयीच्या हे लेख विभिन्न घटानांची आणि शोधांची माहिती देत असले तरी त्यांच्यात विलक्षण साम्य आहे. ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रात रस असलेल्या एका व्यक्तीला अवकाशात डोळे रोखले असतांना त्याला गुरु ग्रहावर एक नविन डाग दिसला. बाराकाईने निरिक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की तो डाग म्हणजे गुरु ग्रहावर पडलेला खड्डा आहे. त्या खड्ड्याचा आकार पृथ्वी एवढा आहे. कश्यानी तो खड्डा पडला याची कल्पना अजुन खगोलशास्त्रज्ञ्यांना नाही. पण पृथ्वी एवढा खड्डा पडण्यासाठी आणि पाडण्यासाठी शक्ति या जगात उपस्थित आहे हे बघुन मन विस्मित होत. दुसरा लेख, सुर्यावरच्या काळ्या डागांबद्दल होता. या डागांची निर्मिती कशी होते आणि एका विशिष्ट कालामाना नंतर त्यांची संख्या कशी वाढते किंवा कमी होते याबद्दलची चर्चा त्या लेखात केलेली होती. हे डाग पृथ्वीच्या आकारमानाचे असतात. आणि या डागांमुळे सूर्याची उर्जा केवळ ०.१ टक्क्याने कमी होते. पण तरी पृथ्वीच्या वातावरणात त्यामुळे प्रचंड बदल घडतात. काही भागात दुष्काळ तर काही भागात वादळ अचानक पणे उत्पन्न होतात. हे सगळे शोध गेल्या तीस-चाळीस वर्षात लागले आहेत. त्या आधी देवीचा प्रकोप म्हणुन बकरा बळी देण्या पलिकडे आपल्य हातात काहीच नव्हत. अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंबद्दल तर सोडाच पण डोळ्यांना न दिसणार्‍या सुक्ष्म जंतुबद्दल सुध्दाही आपण काही करु शकत नाही.

तिसरा लेखात आपल्या आतड्यात असलेल्या जंतु जगतावर होता. पोटातील सगळेच जंतु हानिकारक नसतात. खरतर फारच कमी जंतु हानि पोचवतात. बहुतांश मंडळी पोटात नेमक काय करतात याचा संशोधकांना आताशा कुठे कळु लागल आहे. पचना व्यतिरिक्त हे जंतु आपल्या तब्येतीच्या आणि स्वभावाच्या विशिष्ट प्रणालीस कारणीभूत असतात असा वैज्ञानिकांचा कयास आहे. पुढल्या काही वर्षात या विषयावर अजुन प्रकाश पडेल.

थोडक्यात, आपल्या हातात किती गोष्टी आहेत आणि अवकाशातल्या अवाढव्य वस्तुंपासुन ते पोटातल्या सुक्ष्म जंतु पर्यंत अनाकलनिय घटना आपल आयुष्य, आपल्या व्यक्तिमत्वास कसा आकार देतात या बद्दलही आपल्याला पूर्ण कल्पना नाही बघुन आपल्या अज्ञानाची आणि क्षुद्रतेची जाणीव प्रखरतेने होते.

पण गंमत अशी की हे माहिती कळुन सुध्दा आपण ढीग काय करू शकतो? सुर्यावरचे डाग काढु शकतो? कि गुरुवर ज्या अवकाशातल्या उल्केने गुरु ग्रहावर महाकाय गर्त निर्माण केला ती उल्का उद्या पृथ्वीवर येत असेल तर थांबवु शकतो? आपल्या आयुष्याची, जगण्याची क्षुल्लुकता बघुन मन भ्रमित होत. पृथ्वीला जग मानुन आपण त्यावर राज्य करू पहातो. विध्वंस घालतो, जगाचा वाली म्हणवुन घेतो पण आपल्यात आणि मुंगीत काहीच अंतर नाही. दोघांचेही अस्तित्व सारखेच, क्षणभंगुर.

यालाच शंकराचार्य मिथ्या म्हणत असावेत. स्वत्वाची कल्पना आपल्याला असते, कर्त्याची जी भावना आपण उराशी घेउन वावरतो ती कल्पनाच मूळ भ्रम आहे.

जवळपास १ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर डायानोसोरस वावरत होते. त्यांचा आता नामशेषही उरला नाहीया. विविध आकारमानाचे, विविध जातींचे हे जीव झटक्यात नाहीसे झालेत. उरली फक्त धुळ आणि त्याचे दगडात उमटलेले अवशेष. सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य प्राणी पृथ्वीतलावर वावरु लागलेत. वैज्ञानिकांच्या मते विश्व निर्मिती जवळपास १३ बिलियन म्हणजे १३ अब्ज वर्षापूर्वी झाली.म्हणजे पुढची १२ अब्ज, ९९ करोड, ९८ लाख वर्ष विश्वाचा कारभार आपल्या उत्पत्तीची वाट बघत ताटकळला नव्हता. सगळ जस व्हायच तसच झाल. आणि या चित्रातुन मनुष्याला काढुन टाकल तरी जे व्हायच तेच होईल. तरी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल किती माज असतो बघा.

कुसुमाग्रजांची मातीची दर्पोक्ती या कवितेतील कडवी आठवतात,

अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

पण खर बघता याला दर्पोक्ती म्हणणे चूक आहे. काय खोट बोलतेय माती इथे? पण आपल्या अहंकाराला ठेच पोचते म्हणुन या विचारांना दर्पोक्ती ठरवणार. जर का अब्जो वर्ष आपल्याविना अडल नाही आणि पुढली अब्जोवादी वर्ष अडणार नाही तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय आहे? याच उत्तर सोप आहे. काहीच नाही. पण मग अस म्हटल तर गोंधळ होईल म्हणुन आपण तत्त्वज्ञानाचा पदर धरतो. पाण्याच्या आरश्यात आपल्या क्षणभंगुर प्रतिमेला खर ठरवण्याचा विफल प्रयत्न करतो.पाणी वाहुन गेल्यावर प्रतिबिंब नाहीस होत. काळाच्या ओघात, तसच, आपणही नाहीसे होईल. जगातील अव्यक्त, निराकार, निर्गुण शक्ति माझ माहेर आहे आणि त्यात विलिन होण माझ लक्ष्य आहे हे सगळं थोतांड वाटत. असली अव्यक्त शक्ति वास करत नसेल अस नाही. पण विश्वाच्या पसार्‍यात तिला आपली काळजी आहे अस वाटण खुळेपणा आहे. आणि का असावी? काय बाजी मारली आहे आपण, कुठले चांद-तारे लावले आहेत आपण?

गुरु त्याच्या कक्षेतून थोडा जरी हलला तरी आपण नाहीसे होऊ. किंवा गुरु त्याच्या कक्षे ऐवजी दुसर्‍या कक्षेत असता तर पृथ्वीवर जीवच उपस्थित झाले नसते. दर वर्षी एकदा तरी बातम्या येतात की पृथ्वीवर लौकरच उल्का लौकरच आपटणार आहे. आता खरच अस होणार आहे की नाही देवच जाणे. पण अस व्हायच असेल तर ती उल्का फार मोठी असण्याचीही गरज नाही. दहा-पंधरा मैल लांबी-रुंदीची उल्का जरी पृथ्वीवर आपटली तरी आपण क्षणार्धात नाहीसे होऊ.

पावसात घरी दिव्यापाशी घोळका करणार्‍या किड्यांची आपण कीव करतो. कारण एका रात्रीपुरतेच त्यांना पंख फुटतात आणि उजाडेस्तोवर ती सगळी मरुन जातात. आपल्या जीवनात एका रात्रीला महत्त्व आहे त्याहुन कमी महत्त्व विश्वाच्या कालमानात आपल्या अस्तित्वाला आहे. सध्या पंख फुटले आहेत म्हणुन आपण गुटुर-गुटुर करतोय. उद्या पंख झडलेल्या अस्तित्वाला काळाची केरसुणी झाडुन टाकणार एवढ नक्की.

ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !