मला प्रयागराज ला पोचल्यावर हुश्श झाला. इतकी धावपळ आणि धाकधूक पोचायला कि तिथे पोचल्यावर आता गंगा दर्शन होणार आणि स्नान होणार याची खात्री झाली. प्रयागराज जरी पोचलो तरी अजून घाटापासून ८-१० किमी दूर होतो. आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि दुचाकी टॅक्सी करून घाटावर पोचलो. घाटावर पोचल्यावर सगळ्यात पहिले मला काही जाणवले असेल तर सगळ्या समारंभाची आणि समारंभाच्या सोयीची भव्यता आणि शिस्त. आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी गर्दी आधीच्या तुलनेत बरीच कमी होती. पण दूर-दूर पर्यंत तंबु पसरले होते, मोठे तात्पुरते रस्ते, इलेक्ट्रिक ऑटो आणि पुन्हा मोट्ठी मोकळी जागा आणि मग त्या पुढे गंगेचे पात्र. एका टप्प्यात डोळ्यात काहीच भरत नव्हते आणि ठरत नव्हते. जिथे एक मुख्य रस्ता होता, तिथं पर्यंत गंगेचे पाणी पावसाळ्यात येत. म्हणजे, महाकुंभाची संपूर्ण सोय, असंख्य तंबू, वाहतुकीचे मार्ग, अगणित लोक, हा सगळं पसारा गंगेने आपल्या पात्रातच सामावलेला होता. स्नान नाहीं झाला तरी गंगेने श्रद्धाळूंना आधीच पावन करण्याची काळजी घेतलेली आहे!
आम्ही दुचाकीने महाकुंभाच्या परिसरात पोचलो. किनाऱ्याची रेती विलक्षण मऊ होती. दुपारची तापली होती म्हणून नाहीं तर रेतीत झोपायला मजा आली असती. रेतीतच स्टीलच्या मोठ्या मोठ्या पाट्या टाकून तात्पुरते रस्ते बनवले होते. त्यावर चालायालाही सोय होती आणि तसेच इलेक्ट्रिक ऑटो पण मिळत. किनार्यावर अनेक घाट होते, आणि वेगवेगळ्या घाटापर्यंत पोचायला इलेक्ट्रिक ऑटोने जाणे सोयीचे होते. आम्ही अश्याच ऑटोत बसून संगम घाटावर गेलो. आम्ही ज्या बाजूने संगमाच्या दिशेने प्रवेश केला होता, त्याबाजूने यमुना येते, आणि मध्ये एक रेतीचे छोटे बेट आहे आणि त्या पलीकडून गंगा येते. आणि मधून गुप्त अवस्थेत सरस्वती येते. संगम घाटावर नदीचा प्रवाह फार वेगाने होता. झर-झर पाणी वाहात होते. पलीकडचे गंगेचे पण पाणी असेच वेगाने येतांना दिसत होते. घाटावर छान पायऱ्या बांधलेल्या होत्या आणि सगळी कडे अविरत स्वच्छता केली जात होती. पायऱ्या संपल्यावर पाण्यातील एक मोठा परिसर मोठं-मोठ्या प्लॅस्टीकच्या पिंपांना दोरखंडांनी बांधून वेढलेला होता, जनतेसाठी संगम घाटावर स्नान करायला. सहाजिकच त्रिवेणी संगमावर सगळ्यात अधिक गर्दी होती. तिथून काहीच अंतरावर वी-आय-पी लोकांचा पास असलेल्यांसाठी होड्यांची व्यवस्था होती. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य जनतेसाठी होड्यांसाठी अजून एक वेगळा धक्का बांधलेला होता.
मी संगम घाटावरच पाण्यात आत गेलो. पाणी गुढग्याएवढेच होते. लोक जागोजागी पूजा करीत होते. आणि नारळ पाण्यात टाकीत होते. इतक्या गर्दीत, कोलाहालात, लोक इतके मग्न होऊन प्रार्थना, पूजा-अर्चा करीत होते कि मी त्या लोकांना बघण्यातच गुंतलो. किती श्रद्धा आणि केवढा भक्ती-भाव! देवावर श्रद्धा, पुनर्जन्मावर विश्वास आणि पाप-पुण्याच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्तीसाठी केवढी तळमळ. खूपदा आपण बुद्धिजीवी उगाच प्रश्नांच्या जाळ्यात फसतो आणि स्वतःला फसवितो. हुशार होण्याच्या भानगडीत भाबडेपणा हरवून बसतो. भाबडेपणाला अंधश्रद्धा समजून बसतो. या दोन्हीत बरेच अंतर आहे. कुंभमेळा असो कि आपली विठ्ठलाची वारी असो, तेथे जाण्याचे आमंत्रण कोणाला नसते, तेथे येण्यासाठी कोणालाही आवाहन केल्या जात नाहीं, जाण्याचा जोरा कोणावर नाहीं किंव्हा गेलो नाहीं तर मोक्ष मिळणारच नाहीं असेही नाहीं. पण तरी शेकडो-हजारो वर्षे लोक संख्येने प्रयागराज ला पोचतात. विठ्ठलाच्या वारीला जातात. आपला हिंदू धर्म एक नाहीं असे म्हणणाऱ्यांनी या कुंभला भेट द्यायला हवी होती. त्या जागेची ऊर्जाच वेगळी होती. सगळं परिसर जणू तेजपुंज झाला होता. म्हणूनच अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी कोटी आलेत. सगळं देश या समारंभाचे आकर्षणाने मोहून गेला.
संगम घाटावर गर्दी बघून, आणि अजून अर्धा किमी दूर जाऊन अजून जास्त गर्दीत, उन्हात, रांगेत उभे राहून संगमाच्या मधोमध जाण्यासाठी होडी घेण्याची इच्छा नसल्यामुळे, आम्ही खालती सोमेश्वर घाटावर जाण्याचे ठरवले. पुन्हा एक दुचाकी वाहन केले, त्याने आम्हाला सोमेश्वर घाटावर सोडले. गेल्या महिन्याभरात गर्दी बद्दल काय काय ऐकले होते. पण आमच नशीब कि सोमेश्ववर घाटावर फारच तुरळक गर्दी होती. मी अजूनही ठरवले नव्हते कि नदीत पूर्ण बुडी मारायची कि नाहीं ते. पाणी फार घाण असणार, पाण्यात कचरा असणार असे विचार मनात घोळत होते. शहरात आयुष्य घालवलेला आणि दररोज शॉवर ने आंघोळ करणारा मी! तरी मी पाण्यात गेलो. माझ्या मुलाने मला गंगेचे पाणी आणायला सांगितले होते. विचार केला बुडी नाहीं मारली तरी आत जाऊन प्लास्टिक च्या बाटलीत त्याच्यासाठी पाणी भरून आणीन. हळू हळू मी आत आत जात होतो. पाणी दिसायला तरी स्वच्छ होते. थोडे प्लास्टिक चे तुकडे वाहत होते. गंगेत स्नान करायची हि माझी पहिली संधी होती.
देवि सुरेश्वरि भगवति गंगे त्रिभुवनतारिणि तरल तरंगे।
शंकर मौलिविहारिणि विमले मम मति रास्तां तव पद कमले ॥ १ ॥ (गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)
(सारांश: हे देवी गंगे, तू तिन्ही जगताची तारिणी आहेस, तू शंकराच्या जटेमधली विहार करणारी आहेस. आणि माझे मन, बुद्धी नेहमी तुझ्या कमलचरणी स्थिर असावेत.)
माझे गंगेचे धावते दर्शन फार पूर्वी झाले होते. आसाम च्या रस्त्यावर, ट्रेन पटण्याहून जाते. पटण्याला गंगेचे अती-विस्तृत पात्र आहे. ट्रेन पाच-दहा मिनिटे तो रेल्वे पूल ओलांडत होती. मी घाई-घाईने एक रुपया ट्रेन मधूनच खालती टाकला आणि नमस्कार केला होता. पण तीला त्याची फारशी आठवण असेल असे वाटत नाहीं. तीला म्हणजे, गंगेला!
मी पाय रेटत पुढे पुढे जात असतांना माझ्या उजव्या बाजूला एक महिला आंघोळ करीत होती. ती कोणाशी तरी बोलत होती. मी आधी फारसे लक्ष दिले नाहीं पण बाजूनी जातांना तिचे बोललेले ऐकू यायला लागले. मला आधी वाटलं फारच भावुक होऊन बडबड करत असावी. पण तसे नव्हते. ती गंगेशी संवाद करीत होती. "आज मेरा पहिली बार आपके यहां आना हुआ है| आपका दर्शन कभी नहीं हुआ था| अच्छा हुआ मुझे आपने बुला लिया "
मी चकित होऊन ऐकू लागलो. माझी पाण्यात ओढत चाललेली पाऊले संथावली.
"मुझे बहोत अच्छा लग रहा है आपसे मिल के, आपका दर्शन ले के| मैं बहुत खुश हुं|" असे काहीसे बोलत ती गंगेत बुड्या मारीत होती. तिचा गंगेशी चाललेला संवाद असेल, आजूबाजूला अथांग पसरलेला मानवतेचा सागर असेल, कोणाचीहि वाट न बघता, अविरत, अखंड वहाणारी गंगा असेल, पण मला भरून आले.
वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।
अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ ११ ॥
(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)
(सारांश: हे गंगे, तुझ्या काठचा मी कासव असलेलं मला चालेल, तुझ्या पाण्यातला मासा बनलेलं मला चालेल किंव्हा तुझ्या काठी साधारण आणि क्षीण सरड्याचे अस्तित्व सुद्धा मला चालेल. तुझ्या काठी एखाद्या दीन, हीन कुळातील व्यक्ती म्हणून माझा जन्म झालेला चालेल पण तुझ्या काठापासून दूर कुठल्या राज्याच्या राजपद सुद्धा मला नको.)
मी काही अंतर चालत जाऊन 'बुडू, बुडू गंगे' म्हणत तीन बुड्या मारून स्नान केले. पाणी गार, आल्हादायक होते. तिसऱ्या बुडी नंतर मला एकदम शांत आणि प्रसन्न वाटायला लागले. आजूबाजूचा कोलाहल कमी ऐकू येऊ लागला. मनातला कोलाहल हि कमी कमी झाला. स्वतःचे श्वास ऐकू येऊ लागले. मगाशी दिसलेल्या बाई सारख मी पण गंगेशी गप्पा मारू शकत नाहीं या उणिवेची जाणीव झाली. भक्तीत एवढा ठामपणा नाहीं. एवढी शक्ती नाहीं. पण गंगेला त्याचे काही नाहीं. तिने तेवढ्याच प्रेमानें मला कवटाळले होते.
मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु || ५२||
(गंगा लहरी, जगन्नाथ पंडितराज)
राजा भगीरथाने हजारो वर्षांपूर्वी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली अशी गोष्ट आहे. गंगा स्वर्गातून आली कि नाहीं हा आस्थेचा प्रश्न आहे पण हजारो वर्ष स्वर्गातल्या अमृताचे काम गंगा अविरत करीत आहे. आपली संस्कृतीला जन्म देणारी आणि आपण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करण्याची क्षमता असलेली गंगा, आपल्या सनातन धर्माची केंद्रबिंदू आहे.
रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ ९ ॥
(गंगास्तोत्रं, आदी शंकराचार्य विरचित)
मृत्यूसमयी गंगेचे दोन थेंब प्राशनास देतात तर मृत्यूनंतर अस्थी विसर्जनही गंगेतचकरतात. काशीला, मनकर्णिका घाटावर तर मृत्यूसुद्धा गंगेकिनारी व्हावा यासाठी ताटकळत असतात. अश्या या गंगामाईच्या धारेत मी न्हात होतो. अविस्मरमणीय, अलौकिक आणि शब्दात पकडण्यासाठी अशक्य असा हा अनुभव होता. माझ्या सारखे करोडो लोक जीवाची पराकाष्ठा करून प्रयागराज ला येत होते. बाहेरून बघता करोडो लोकांची गर्दी दिसत असेल पण त्या गर्दीत, गंगेत उभे असतांना फक्त तुम्ही आणि गंगेचे खळखळते पाणी. या अत्यंत वैयक्तिक अनुभवासाठी जनसमुदाय लोटत होता. लहान-मोठे, स्त्री-पुरुष, तरणे-ताठे, गरीब-श्रीमंत, हेलिकॉप्टर-विमानाने, ट्रेन, घोडे-गाड्यांनी, आणि शेवटी तर पायी, पण गंगेकिनारी पोचत होते. कारण गंगेसाठी सगळे सारखेच. मला मोक्षासाठी मध्यस्थीची आणि मध्यस्थांची आवश्यकता नाहीं, माझ्या मोक्षाची जवाबदारी माझीच आणि त्यासाठी गंगा मदतीस धावत येणार हि भावना अगदी तळा-गाळापर्यंत रुजली आहे. त्यामुळे कुठल्याही निमंत्रणाशिवाय पन्नास करोड लोक महाकुंभला आलेत. अश्या भूमीत, धर्मात आणि संस्कृतीत जन्म मिळाला हे अहोभाग्यच.
स्नान करून आम्ही लगेच प्रयागराज सोडले. आपली संख्या कमी करून, येणाऱ्या लाखों साठी थोडी जागा केली. थोडीशीच. तेवढेच खारीचे योगदान.
प्रयागराजचा ११०० कि.मी चा कार चा प्रवास करण्यात बरीच दगदग झाली होती आणि परतीचा प्रवास शिल्लक होता पण मन प्रसन्न होते. संगम स्नान, गंगास्नान झालेच पण अखिल भारतीय समाजाचे दर्शन झाले. मी नवव्या इयत्तेत असतांना NCC तर्फे आसाम ला जायची संधी मिळाली होती. ट्रेन मधून चार दिवस प्रवास करतांना भारताचे जे दर्शन झाले त्याचे पडसाद आणि त्याचे प्रतिसाद २८ वर्षे झालीत पण माझ्या मनात आणि माझ्या व्यक्तिमत्वावर अजूनही आहेत. यंदाचे दर्शन फार वेगळे होते. भारत बदलला आहे. आता देश प्रगतीच्या ठाम मार्गावर वेगाने पुढे जातोय. या प्रवासाची, समाज दर्शनाची, या अनुभवाची अवीट गोडी उरलेला जन्मभर राहील एवढे नक्की.