7/8/07

मोमिनपुरा

माझा एक चांगला मित्र मोमिनपुर्‍यात रहात असे. त्याच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा संपुर्णतः मुस्लिम भागात जायचा माझा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मी थोडा मनातुन घाबरलेलो होतो. इतका गजबजलेला परिसर मी आधी कधी बघितला नव्हता. पोद्दारेश्वर राम मंदिरच्या थोड पुढे गेल्यावर सेंट्रल ऍव्युनु वर डाव वळण घेतल्यावर मोमिनपुर्‍याची हद्द सुरु होते. त्या रस्त्याचे नाव बहुदा मोहम्मद अली रोड आहे. रस्त्याच्या डाव्या बाजुला भली मोठ्ठी मशीद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला बाजार भरतो. रस्त्यावर वेग-वेगळ्या आकाराच्या गाड्या हॉर्न वाजवित वेगाने जायचा वायफळ प्रयत्न करत होते. दुकानांमधील सामान दुकानाबाहेर अधिक होतं. माझा मैतर मला उजवीकडच्या बोळीत घेउन गेला. हा परिसर गरिब, झोपडपट्टी अश्यातला वाटत नव्हता कारण तरुण मुले व पुरुष बर्‍याच चांगल्या दर्जाचे अफगाणी पध्दतीचे झब्बे-पायजमे घालुन हिंडत होते. लहान मुले रस्त्यावर खेळत होती. बायका मात्र जास्त दिसत नव्हत्या. बहुधा संध्याकाळची वेळ असेल म्हणुन दिसत नसाव्यात. पण ज्या थोड्या फार बायका दिसत होत्या त्या बुरख्यातच दिसत होत्या. अगदी लहानश्या गल्लीतुन आम्ही सायकलने दोघे जात होतो. मी हिंदु आहे म्हणुन माझ्या कडे लोकं बघतायत असं मला उगीच वाटतं होतं. पण गल्लीत ये-जा करणारे सगळेच लोक एका-मेकाला असंच बघत असावेत.

त्याचे घर ज्या गल्लीत होते ती बोळ अजुन लहान होती. दोन स्कुटर एकाच वेळेस त्या गल्लीत मावणे अशक्य होत. त्याचं घर चार मजली होतं. ब्रेड च्या पाकीटासारख एकावर एक मजले बांधले होते. समोर वर्‍हांडा मग एक लहानशी खोली, त्यामागे स्वयंपाक घर आणि तिथेच न्हाणीघर. एवढ्या भागावर तीन मजले आणि त्यावर गच्ची. अश्या या अंधार्‍या घरात माझा मित्र त्याची एकुण नऊ भावंडे, त्याचे आई-वडिल, त्याचे काका-काकु व त्या काकाची चार मुले असे सगळे रहात होते. माझा मित्र वयाने भांवडांमधे दुसर्‍या क्रमांकाचा होता. सगळ्यात मोठा भाऊ याच्याहुन ३-४ वर्षांनी मोठा तर सगळ्यात लहान बहीण याच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असावी.
" अब, क्या है की मेरा घर तेरे घर समान बडा नही है । छोटा है और काफी लोग़ रहते है।"
माझं घर मोठं होत अश्यातील प्रकार मुळीच नव्हता पण आमच्या घरात फक्त चारच लोकं होते.
" ऐसी कोई बात़ नही है यार। घर आखिर घर होता है। जैसा हो पर अपना तो होता है।"
" हां, ये बात तो सही है। चल सबसे उपरवाली मंजील़ पर जाते है। वहाँसे काफी़ अच्छा नज़ारा है।"

आम्ही गच्चीवर गेलो. गच्चीवरुन सगळं मोमिनपुरा दिसत होत. अस्ताव्यस्त पसरलेल. ज्याला हव तस आणि हवं तेवढ्या उंचीची घरे, जिथे जागा मिळेल तीथे इमारती बांधलेल्या होत्या. घराच्या नैॠत्येला मशीद दिसत होती. सगळ्या घरांवर हिरवे झेंडे लावले होते. बर्‍याच घरांवर काळे झेंडे लावले होते. काळे झेंडे काय दर्शवितात हे मला त्याला विचारायच होतं.
तेवढ्यात तो म्हणाला " चलं, हमारी छोटी फॅक्टरी दिखाता हुं।"
"कहां है? यहीं पास़ मे ही है?"
"हां" गच्चीवरुन खालती कुठल्यातरी इमारती कडे बोट दाखवित तो म्हणाला. "वो है।"
खालती पसरलेल्या बोळींच्या व लहान लहान घरांच्या अगम्य जंजाळात नेमकी कुठली इमारत तो मला दाखवत होता याचा मुळीच गंध लागला नाही.

त्याच्या वडिलांचा हातमागावर लुंग्या बनविण्याचा लहानसा धंदा आहे. ज्या रंगाच्या लुंग्या मी तिथे बनतांना बघितल्या त्यावरुन त्यांची विक्री फक्त मोमिनापुरा किंवा तत्सम परिसरातच होत असावी. ही हातमागाची जागा दोन घर सोडुन लगेच होती. गरम, दमट आणि अंधार्‍या जागेत हा उद्योग चालू होता. या व्यतिरिक्त या कुटुंबाच्या दोन ट्रक भाड्यानी देण्याचाही उद्योग होता. " हमारी एक जमाने मे दसं-दसं ट्रके रस्ते पर दौडती थी। पर दो गाडीयोंका एकसाथ ऍक्सिडेंट हो गया। वो चक्कर मे पुरा का पुरा धंदा बैठ गया। अभी धीरे-धीरे धंदा फिरसे रस्ते पर आ रहा है।"
गेली काही वर्षे या कुटुंबानी बर्‍याच खस्ता खाल्या असाव्यात.

घरी आईने जेवणाची तयारी केली आहे अस कुठल्यातरी भावंडाने निरोप आणला. पण रात्रीचे आठ वाजायला आले होते. त्यामुळे मला घरी जाण भाग होत.

नाही म्हटल तरी हा सगळा प्रकार थोडा अंगावर येण्याजोगाच होता. इतकी भावंडे, इतक लहान घर व पैसा कमविण्याची एक तळहातावर खाउन जगण्यासारखा सिमित उद्योग हे सगळं थोडं भीतीदायक होत. तसं घर खाउन-पिउन सुखी होत. पण एकुण मोमिनपुर्‍यात सगळीकडे हीच परिस्थिती आहे असं माझ्या मित्राच्या बोलण्यावरुन वाटले. याचा अर्थ असा नव्हे की हिंदु समाज अप्रगत नाही. तसेच एका उदाहरणावरुन कुठलं मत ठामपणे मांडणेही उचित नव्हे. (पुढे मी मुंबईच्या भेंडी बाजार भागात गेलो तिथेही असलीच परिस्थिती होती.) पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे भारत आज एवढी प्रगती करत असतांना या भागात भविष्याबद्दल फारशी उत्सुकता कोणाला नाही. कारण एकंदर शिक्षणाबद्दल उदासिनता, त्याअन्वये, तंत्रज्ञानाशी संबधीत असलेल्या उपलब्ध संधींचा फायदा उठविण्याची असमर्थता तसेच स्त्री-शिक्षण व कुटुंब नियोजनाच्या नावानी शंख. या कारणांमुळे १९९० नंतर उदयास आलेल्या अर्थशास्त्राच्या नविन गणितात या समाजाला जागा मिळण कठिण जातय.

अश्या परिस्थितीत धर्मांधता वाढणे सहाजिकच आहे. आणि जर का कोणी तरुण या परिस्थितुन बाहेर पडु इच्छित असेल तर राजकीय पक्ष प्रगतीची दारं अडवितात. हे सगळं प्रकरण कसं आणि कधी बदलणार, माहिती नाही. पण लौकरात लौकर काहीतरी करणं आवश्यक आहे नाही तर फक्त त्यांचेच नव्हे तर इतरांचे भविष्यही धोक्यात आहे.

3 comments:

Amit Rahalkar said...
This comment has been removed by the author.
Amit Rahalkar said...

very apt...
You have a nice flow to your writing...
enjoying every one of your marathi blogs...
Jai Namjoshi Madam !

कोहम said...

chaan lihilays....tuza mhanna khara aahe......muslim lokankade ajunahi aapan "Te" mhanun pahato ani tehi apalyakade "Te" mhanunach pahatat. "Te" che "Apan" kadhi hoil tevha khara..