4/25/09

कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।

कृष्ण गोविंद गोपाल गाते चले।
मनको, विषयोंके विषसे हटाते चले॥धृ॥

इंद्रियों के न घोडे, विषय से अडे।
जो अडे भी तो, संयम के कोडे पडे।
मन के रथ को, सुपथ पर बढाते चले ॥१॥

नाम जपते रहे, काम करते रहे।
पाप की वासनाओं से, डरते रहे।
सद् गुणोंका परमधन कमाते चले॥२॥

लोग कहते है, भगवान आते नहीं।
रुक्मिणी की तरह, हम बुलाते नहीं।
द्रौपदी की तरह, धुन जपाते चलो॥३॥

लोग कहते है, भगवान खाते नही।
भिल्लिणी की तरह हम खिलाते नहीं।
साक प्रेमी विदुर रस निभाते चले ॥४॥

दु:ख मे तडपे नही, सुख मे फुले नही।
प्राण जाये मगर, धर्म भुले नही।
धर्मधन का खजाना, लुटाते चलो॥५॥

वक्त आयेगा ऐसा, कभी ना कभी।
हम भी पायेंगे, प्रभुको कभी ना कभी।
ऐसा विश्वास मनमे जमाते चलो॥६॥

या कवितेचे रचनाकार कोण आहे, हे मला माहिती नाही. कोणाला रचनाकाराची कल्पना असेल तर अवश्य कळवावे.

4/20/09

आगामी लेख

आगामी लेख -:

शिव-राज्यारोहण भाग २

रेखांकित (दिर्घकथा)

श्री गणेश वंदना भाग ४

4/13/09

चांदोरकर सर- भाग २

सरांचे लेंढ्रा पार्काजवळ मोठ्ठ घर होत. त्यांनी नुकतच ते बिल्डर ला विकुन फ्लॅटस बांधुन घेतले होते. त्या इमारतीतच त्यांचा मोठ्ठा फ्लॅट होता. त्यांच्या कडे येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते शिकवणी वर्गात प्रवेश देत असत. त्यामुळे बंड मुले बरीच येत असत.आता बंडपणा सगळीच मुलं करतात (काही शंख अभ्यासु मुळे वगळता!) पण मस्ती करण्यातही बरेच रंग असतात. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा गडद काळा रंग म्हणजे वाया जाण्याची मुख्य चिन्हे असत. असली नालायक मुलेही त्यांच्या वर्गात असत. त्यामुळे शांतपणे वर्ग चालला आहे आणि सरांनी शिकविलेलं सगळ्यांना समजतय अस नेहमीच होत नसे. एकतर सर स्वतःच सतत विनोद करायचे. त्यामुळे मुले ही सारखी मस्ती करायची. बहुधा म्हणुनच "हुशार" मुलांनी सरांच्या शिकवणी लावणे बंद केले. आणि मेरिट येण्यार्‍या लोकांची संख्या कमी झाल्यावर सरांना शिकविता येत नाही अशी समजुन नविन पालकांनी करुन घेतली. सरांना हे कळत नव्हत अस नाही पण यावर उपाय काय हे सुचत नसाव. त्यांची खिन्नता मधुन मधुन डोकावत असे. जुन्या नावाजलेल्या विद्यार्थ्यांचा ते सारखा उल्लेख करत असत पण कधी कधी मुलांच्या मस्तीनी ते कावुन जात असत. मग ते खालच्या आवाजात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगत की 'श्रीकृष्ण मराठे कधीच अशी मस्ती करत नसे. नेहमी प्रश्न विचारित असे. हुशार होता पण अभ्यासही खुप केला त्याने. म्हणुनच इतक्या वरचा मेरिट आला'.

श्रीकृष्ण मराठे आमच्या शाळेतुन बहुधा पहिल्या दहा मधे मेरिट होता. शाळेच्या वाचनालयात त्याच नाव लावल होत. तो माझ्याहुन ३-४ वर्ष मोठा असावा.

आमच्या वर्षी सरांच्या शिकवणितुन कोणी मेरीट आल नाही. 'पहिला मेरिट' तर मेरिट लिस्ट च्या आस-पास हि भटकला नाही. मला गणितात अपेक्षेप्रमाणे टक्केवारी मिळाली. मला डि ग्रुप ची गणित सोडविता आली याचा मला खुप आनंद झाला. गणिता बद्दलची भिति सरांनी काढुन टाकली. (१२ वीच्या शिकवण्यांनी ती भीती परत मनात कायमची बसली!) सरांच्या पुढल्या वर्षीच्या शिकवण्या व्यवस्थित सुरु होत्या. तेच विनोद पण हशे मात्र नविन पिकत होते. मी अधेमधे सरांकडे डोकावत असे. दसर्‍याला हमखास मी सोनं द्यायला जात असे. खुपदा संध्याकाळी सर फाटकात उभे असायचे. सरांच्या हातात कला छान होती. पेंटिंग तसंच कागदाच्या किंवा लाकडाच्या कलाकृती ते फार छान करत असत. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे ते क्लासच्या जागेत छोटस प्रदर्शन लावित असे. त्यांना त्यांच्या कलाकृतींचा फार अभिमान होता. शिकविण्याच्या तापातुन निघण्याचा तो त्यांचा मार्ग असेल. मला आणि पराग ला नेहमी ते म्हणत असत कि "एवढे गोरे-गोमटे आहात थोड्या कलाकृती विकुन द्या" मग आम्ही म्हणायचो की "सर, कमिशन किती देणार?".

आम्हीही वाह्यातच पोरं होतो!


सरांची तब्येत तेवढी धड-धाकट नव्हती. आमच्या वर्षी आम्हाला त्यांच्या तब्येती मुळे एक-दोन आठवडे सुट्टी मिळाली होती. ते बरेचदा 'आज मुळीचबरं वाटत नाही या' अस म्हणत असत. त्यांच्या इतर विनोदांपैकी हा पण एक विनोद होता की ते खरच म्हणत असत हे कळायला मार्ग नव्हता. तेंव्हा सरांच्या गणितोत्तर प्रत्येक वाक्याला आम्ही हसत असु. मी दहावी झाल्या नंतर दोन वर्षाच्या आत सर वारलेत. मला उशीरा कळल. रामदास पेठेच्या टवाळखोर मित्रांशी भेटी कमी होत असत आणि तरूण भारताने नेहमीच्या नियमाने निधनाची बातमी छापायला दोन दिवस घेतलेत. अंत्ययात्रेला जाता आल नाही याच मला फार वाईट वाटल. मनात उगाचच अपराधी भाव येत होता. सरांना तुम्ही खुप छान शिकविता अस एकदा तरी म्हणायच होत.

मी आणि पराग नंतर त्यांच्या घरी दिव्याला नमस्कार करायला गेलो होतो. घराच्या फाटकात "का, रे, पार्कात कोणा-कोणासोबत दिसतोस तू! चांगल्या पार्कात घेउन जाव "कोणा-कोणाला" लेंढ्रा पार्कात काय?" अस म्हणायला सर नव्हते. सर नसल्याची जाणीव पहिल्यांदा तिथे झाली.

बाहेरच्या खोलीत दिवा तेवत होता. त्यांच्या पत्नी बसल्या होत्या. "सर, नेहमी साठी गेलेत" अस त्या कसतरी म्हणाल्यात. त्यांना हुंदका आवरत नव्हता. आमच्याकडेही फारस बोलायला काय असणार. नमस्कार करून आम्ही परतलो. आमचा जेमतेम सहवास एक वर्ष तरी आम्हाला एवढ वाईट वाटत होत. सरांच्या कुटुंबियांवर काय बितत होती ते न कळलेलच बर.

सर नेहमी वर्गात म्हणत कि मला शिकवितांच मरण याव. गणिताचा थिओरम शिकवुन, कोरोलरी शिकवायच्या आत इथेच खडुने माखलेल्या फरशीवर धाडकन कोसळुन जाव. मरतांना गंगेच्या पाण्या ऐवजी तोंडात थोडा खडुचा चुरा टाका अस ते म्हणत असत.

"का रे पहिला मेरीट करशील एवढ माझ्या साठी?"

"हो सर"

"कसला नालायक आहे हा पोरगा. माझ्या मरायची वाट बघतोय. फी आण उरलेली आधी. माझ्या तोंडात खडु टाकायला एका पायावर तयार आहे"

वर्गात परत हशा पिकत असे.

तसल काही झाल नाही आणि सर सर्व मान्य मार्गाने हॉस्पिटल मधे गेलेत. पण त्या आठवणींनी अजुनही हसु येत. आणि सरांनी शिकविण्यावर किती निरातिशय प्रेम केल हे बघुन नवल वाटत. आजकालच्या निव्वळ पैश्यासाठी शिकविणार्‍यांच्या गर्दीत शिकविण्याच्या प्रेमापोटी शिकविणार्‍या पैकी ते बहुधा शेवटलेच होते.

(समाप्त)

4/8/09

चांदोरकर सर - भाग १

"आमचं आण्णाव चांदोरकर आहे. आम्ही दोरानी सगळ्यांना बांधतो. एका-मेकांना जवळ करतो. चांदूरकर वेगळे. ते सगळ्यांना दूर करतात. गल्लीच्या टोकाशी जे वकील रहातात ते चांदूरकर. आम्ही चांदोरकर."

आण्णावा बद्दलचं हे विश्लेषण विद्यार्थी पहिल्यांदा ऐकत नव्हते. पण सर ज्या उर्मीने आणि उत्साहाने सांगत ते ऐकुन प्रत्येक वेळेस हसु येत असे.

"अरे, काय रे पहिला मेरिट?" मागल्या बाकावरच्या विद्यार्थ्याकडे बघुन ते ओरडले.

"लक्ष आहे का मी काय बोलतोय ते? काय आण्णाव आहे माझ?"

"चांदूरकर" मागुन उत्तर आल.

"नालायक आहे तो. पहिला मेरिट यायच्या आधीच फुशारकी मारतोय लेकाचा." सर जवळच्या विद्यार्थ्यांना म्हणालेत.

" हो बरोबर आहेय तूझ. तू दूर आहेस ना माझ्यापासुन म्हणुन माझं आण्णाव चांदूरकरच वाटेल तुला. जवळ तर ये, मग टांगतो तूला उल्टा दोरानी आणि देतो डी ग्रुपच्या प्रश्नांची धूरी!"

वर्गात हशा पिकला. पहिला मेरिटही हसत होता. दहावी गणिताच्या पेपरमधे शेवटचे २० गुण डी ग्रुप म्हणुन प्रसिध्द होते. पुस्तका बाहेरचे हे प्रश्न फार कठिण मानल्या जात असत. फाटका समोर देशमुख उगाच घुटमळत होता.

"ऐ, काय रे? मागल्या वर्षी क्लासमधे होता तेंव्हा तर नाहि आलास कधी. नालायक!"

सगळी मुलं मागे वळुन बघु लागली. देशमुख वर्गातील मुलांना हात-वारे करत पळुन गेला. सगळी विद्यार्थी परत हसु लागली.

चांदोरकर १०वी वर्गाचे गणित शिकवित असत. त्या काळात दहावी बोर्डाच्या परीक्षांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होतो. या परीक्षेत चांगले टक्केवारी मिळाली कि बारावी साठी चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळणार. मग परत शिकवण्या लावायच्यात. मग १२वीच चांगली टक्केवारी मिळाली कि सगळे इंजिनिअर आणि डॉक्टर बनायला तयार. जणु काही पूर्ण आयुष्यच दहावीच्या परीक्षेवर अवलंबुन होत. दहावीच्या वर्गाचा अभ्यास ९ वीच्या परिक्षे आधीच सुरु होत असे. शहरातील एक 'ते' सुप्रसिद्ध शिक्षकानी पालक आणि विद्यार्थ्यांच्या आततायीपणावर चांगला धंदा उघडला होता. ८वीच्या सहा-माही परिक्षेच्या गुणांवर ते सर ९वीच्या शिकवणीत प्रवेश द्यायचे. त्यांची फी रग्गड होती. पण तीथे प्रवेश मिळाला की विद्यार्थ्याला हुशार असल्याचा शिक्का लागायचा. पण गंम्मत एवढ्यावर संपत नव्हती. त्या सरांची ९ वीची परीक्षा शालेय परीक्षेपेक्षा वेगळी होत असे. त्यात कमी गुण मिळालेत तर त्यांच्या १०वीच्या क्लासेस मधे प्रवेश मिळत नसे. अर्थात, १०वीच्या क्लासेस ची फी रग्गड गुणा दोन! त्यांनी स्वतःची शाळाच का उघडली नाही माहिती नाहि. पण बहुधा वाट्टेल तसा पैसा छापता नसता आला.

माझा ८वीच्या परीक्षेमधे बाजा वाजला होता. ९वीत मी अभ्यास करणं सोडुन दिलं होत. पण तरी १०वीच्या उन्हाळ्यात त्या 'सुप्रसिध्द' शिक्षकाच्या समर क्लासेस मधे माझ्या पालकांनी जबरदस्ती घातल होत. तीन महिन्यात मी मुळीच हुशार झालो नाही. (ते सर स्वतः शिकवत नव्हते. त्यांचा 'स्टाफ' आम्हाल शिकवित असे.) पण मला मनापासुन या सगळ्या गोंधळाचा तिटकारा होता. ज्यांना जमत असेल त्यांनी कराव पण मला ते झेपणारं नव्हत. मी जाउन चांदोरकर सरांकडे शिकवण लावली.

"का हो तुम्ही तुम्हाला 'त्या' शिकवणी वर्गात प्रवेश मिळाला नाही का?" सरांनी माझ्या वडिलांना विचारले.

"नाही. पोराचे तेवढी टक्केवारी नाही"

"उन्हाळी वर्ग वगैरे? मी ऐकल की 'ते' उन्हाळी वर्ग ही घेऊ लागले आहेत" सरांच 'त्या' शिक्षकावर फार प्रेम होते.

"समर-क्लासेल लावले होते. पण त्या नंतर पोरगा म्हणतो की तुमच्या कडेच शिकवणी लावायची"

"वेड लागलय त्याला! अहो, मी काही हजार गणित सोडवायला देत नाही आणि मेरीट येईल याची शाश्वतीही देत नाही." सर हसत म्हणाले.

"पोरगा मेरिट येण तसही शक्य नाही." माझे वडिल हसत म्हणालेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता.

"अहो, अस नाही. प्रत्येक पोरामधे काही ना काही असत. सगळ्यांना एक सारखं मानुन हजार गणित देण्यात काही अर्थ नाही"


त्यांच म्हणण बरोबर होत. चांदोरकर सरांच्या शिकवणी एका जमान्यात फार प्रसिध्द होत्या. पण मी जेंव्हा त्यांच्याकडे शिकवित होतो तेंव्हा त्यांचे क्लासेस चालायचे पण पहिल्या इतके ते गाजत नव्हते. थोडक्यात, त्यांच्या वर्गातुन शेकड्यांनी मेरीट येत नव्हते. शिकण्या ऐवजी मार्क मिळविण्या कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत होता. शिकविण्या ऐवजी होम्-वर्क किती दिल्या जातं या कडे शिक्षकांचा कल वाढत होता. याशिवाय, शिक्षक किती फि घेतात या वरुनही त्यांना शिकविता येत की नाही हे ठरवल्या जाऊ लागल. शहरातील 'ते' सुप्रसिध्द शिक्षक त्या काळात ८वी, ९वी १०वीचे पाच ते सात हजार फी घ्यायचे. (प्रत्येक वर्षीचे). गंमतीचा भाग म्हणजे 'ते' सुप्रसिध्द शिक्षक एका काळी चांदोरकर सरांचेच विद्यार्थी होते. सर नेहमी त्याबाबत विनोद करत असत.

"माझाच विद्यार्थी होता तो, त्यामुळे तो यशस्वी झाला तर मला आनंदच आहे" अस ते सारखं म्हणत असत. पण मनात काही तरी चुकचुकत होत. इतकी वर्ष शिकवुन मिळालेला अनुभव आणि विद्यार्थ्यांना समजुन घेण्याची कला त्यांना अवगत होती. गणित कसं शिकवायच हे सुध्दा त्यांना ठाउक होत पण तरी विद्यार्थी असे वेड्यासारखे एक विचित्र अभ्यास करण्याच्या पध्दतीमागे का धावतात हे त्यांना बहुधा कळत नसाव. अर्थात, दुसर्‍या कुणी शिकवुच नये किंवा दुसर्‍या कोणाला शिकविता येत नाही अस त्यांना मुळीच वाटत नसे. पण नविन पध्दती प्रमाणे केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे आणि गणित शिकविण्याऐवजी हजार-हजार उदाहरणं होम-वर्ग म्हणुन देणे याचा अर्थ त्यांना लागत नसावा. या तारखेला हा धडा पूर्ण करायचा आणि या तारखेला कुठल्याही परिस्थितीत कोर्स पूर्ण करुन मग शेवटचे चार महिने नुसत्या परीक्षा द्यायच्या ही असली घोड-दौडही त्यांना समजत नसावी. काळासोबत त्यांची धावतांना दम-छाक होत होती. हे त्यांनाही कळत होत पण शिकविण्याची उर्मी जात नव्हती. शिकवणी वर्ग हा एक प्रचंड मोठा आणि अत्यंत फायद्याचा (भांडवल लागत नाही. विद्यार्थी स्वतःच हलाल व्हायला येतात!) धंदा झाला होता हे त्यांना पचनी पडत नव्हत. ते आधी स्वतः नोकरी करत आणि संध्याकाळी शिकवित असत. पुढे पुढे त्यांनी फक्त शिकवणी वर्गच घेत असत पण त्यांची फी अवास्तव नव्हती. बरीच विद्यार्थी अर्धी फी भरुन पळुन जात असत.

सरांची गणित शिकविण्याची पध्दत सोपी होती. पाठ्य-पुस्तका प्रमाणे ते शिकवित असत. या धड्याची ही पानं एव्हाना संपवायची म्हणजे परीक्षेतील इतक्या प्रश्नांची निश्चिंती. मग पुस्तकावरच्या प्रत्येक पानावरचं प्रत्येक उदाहरण ते फळ्यावर सोडवित असत. धड्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नमालिकेतीलही प्रत्येक प्रश्न ते सोडवुन दाखवित. त्यामुळे व्हायचं काय की गणित कस सोडवायच यासोबतच गणिताबद्दल विचार कसा करायचा हे सुध्दा विद्यार्थ्यांना समजत असे. पण यात एक महत्त्वाचा अंश असा कि विद्यार्थ्याने गृह-अभ्यास करायला हवा. स्वतः गणित सोडवुन, येणारे प्रश्न सरांना विचारायला हवेत. थोडक्यात अभ्यासाची जवाबदारी विद्यार्थ्यानेही उचलायला हवी. घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचे काम शिक्षक करू शकेल पण पाणी पिणे हे काम मात्र फक्त विद्यार्थ्याचे. हजार गणित सोडवुन घेण्यामागे घोड्याला जबरदस्ती पाणी पाजण्यासारख काहीस असाव. पण काही न उमजता यंत्राप्रमाणे हजार गणित सोडवुन प्रगती-पुस्तकावरचे आकडे जुळतातच अस नाही.

(क्रमशः)